पाऊस
*पाऊस*
सर सर घोंगावत सुटला हा, खट्याळ चपळ वारा ।
श्वासा मागुन श्वास घेतसे, ठेवी जपून सारा ॥
असा खोडकर मुलासारखा, नकोस मागे धावू ।
मेघराज बरसता धरेवर, थेंबा थेंबा पाहू ॥
अलगद पडता धरणीवरती, सरी वर सरी ।
पहिली वर्षा , थेंब टपोरे, पडु दे अंगावरी ॥
चिंब जाहली रसा, उमलल्या तृषार्त तरु-वेली ।
दर्या, डोंगरे जणु पांघरल्या, गर्द हरित शाली ॥
सरिता, नाले तुडुंब भरुनी, खळखळ वाहे पाणी ।
नीतळ निर्झर धावत गाती, मंजुळ स्वरात गाणी ॥
सृष्टीचा शृंगार नजारा, पाहू भरून डोळे ।
जलधारांच्या कृपा वृष्टिने, सुख पायाशी लोळे ॥
✍ सौ. प्रतिभा विभूते,
पुणे.©®
Comments
Post a Comment