शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची होणारी परवड

नाही पंढरीशी जाणे ,नाही कधी केली वारी ,
विद्यादान माझे कर्म , हीच माझी रोजची पंढरी.
माझा खडू - फळा , माझे टाळ -वीणा नी मृदुंग ,
फुले ज्ञानाची घेऊन , रोज रंगतो अभंग.
ज्ञानदानाचे हे व्रत , हीच माझी एकादशी ,
माझ्या विद्यार्थ्यांचे यश , हेच माझे प्रयाग नी काशी .
           वाह!!  काय सुंदर विचार, या कवितेत ज्ञानदानाचे कार्य करणार्या शिक्षकाने  मांडले आहेत. पूर्वी गुरू बदल खूप प्रेम आदर वाटत असे. प्रत्येक जण गुरू गृही जाऊन शिक्षण घेत असत. तेथे सर्वांना समानता , स्वावलंबन शिकवले जायचे . शिक्षणात कुठलाही मतभेद होत नसे. गुरू म्हणजे साक्षात परमेश्वर मानत असे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः
गुरुःसाक्षात् परब्रह्म
तस्मै श्रीगुरवे नम:
अशा साक्षात पर ब्रह्म्हांसमान असलेल्या गुरुंना समाजात खूप महत्त्वाचे स्थान आहे. पूर्वी चे गुरू म्हणजे आताचे शिक्षकवृंद. "समाजात अंधकार दूर करून ज्ञानाची ज्योत लावण्याचे काम हे शिक्षक करतात ". आता काळ बदलला आहे. या शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची परवड पाहिली की मन कासाविस होते. शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने शाळा , कॉलेज हे  पैसा कमावण्याचे साधन झाले आहे असे मला वाटतेसमाज परिवर्तन घडवायचे असेल तर उत्तम शिक्षण असणे गरजेचे आहे. समाजातील वाईट रुढी , पंरपरा , अंधश्रद्धा नी भ्रष्ट्राचार शिक्षणामुळे दूर होऊ शकतो. शिक्षणा शिवाय मानवाची देशाची प्रगती होऊ शकत नाही आणि गुरु शिवाय ज्ञान मिळू शकत नाही. ही शिक्षण व्यवस्था ज्याच्या खांद्यावर आहे तोच खांदा जर कमकुवत असेल तर शिक्षण व्यवस्था मजबूत कशी होणार आणि शिक्षण व्यवस्था मजबूत नसेल तर राष्ट्र प्रगत कसे होणार ? यासाठी समाजात शिक्षकांची होणारी परवड थांबली पाहिजे
                आज शिक्षकांकडून खूप अपेक्षा केल्या जातात.विद्यार्थ्याना चांगले शिक्षण , वळण भावी पिढीला योग्य मार्गदर्शक म्हणून शिक्षकांकडे पाहिले जाते. " विद्यादानाचे मुख्य कार्य शिक्षकांचे आहे पण या व्यतिरिक्त अनेक कामांसाठी शिक्षकांना वेठीस धरले जाते".  निवडणूकीच्या काळात तर मतदार याद्या, प्रचार , मतगणना हि कामे तर इतर वेळी गावातील सव्ह्रेक्षण , शौचालय मोजमाप , स्वच्छता अभियान , वृक्षारोपण , श्रमदान यासारखी अनेक समाजोपयोगी कामामध्ये शिक्षक अडकलेले आहेत. निवडणूकीच्या काळात काही शिक्षकांची ड्युटी ग्रामीण भागात असते अशावेळी त्यांना खाण पान , निवास इतर कुठल्याही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या जात नाहीत. असे काम पार पाडणे शिक्षकाला फार मुश्कील होऊन जाते. " कमी मानधन नी कष्ट जास्त " अशा कोंडीत शिक्षक आज सापडला आहे". कामाचा ताण जास्त पडत असल्याने शिक्षकांना विद्यार्थ्यांनकडे नीटसं लक्ष देता येत नाही. " अशैक्षणिक कामामुळे शिक्षणाचा बट्या बोळ झाला असून शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे." कामाचा व्याप खूप वाढल्यामुळे शिक्षकांना ना स्वत: ला ना विद्यार्थ्यांना वेळ देता येत नाही असा चोहोबाजूंनी शिक्षक कोंडीत सापडला आहे. एवढे करूनही नोकरीची खात्री  नाही. सदैव शंकेची तलवार शिक्षकांच्या मानगुटीवर लटकलेली असते.
      शिक्षकांच्या गुणवत्ता मध्ये सतत घसरण होत असताना शिपाई लिपीक च्या जागा काही कारणास्तव रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. त्याची सर्व काम  आता शिक्षकांना करावी लागत आहे. सरकार स्वतः च्या फायद्या साठी भरमसाठ  शाळा , काँलेज ला मान्यता देत आहे. अशा शाळा ,काँलेज ला डोनेशन घेतल्या शिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्याचा लोकांचा कल वाढला असल्याने मराठी माध्यमातील शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. विद्यार्थांची संख्या कमी झाली तर शिक्षकांची संख्या कमी होण्याची भीती शिक्षकांना सतत भेडसावत आहे. " चुकीच्या शैक्षणिक धोरणामुळे नववी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना नापास करता येत नाही .त्याचा परिणाम दहावी च्या निकालावर होऊन टक्के वारी घसरली आहे. त्यापुढील वर्गातील विद्यार्थ्यांच्या संख्या  ही कमी झाली आहे.कोणाला ही  नापास करायाचे नाही या धोरणामुळे विद्यार्थ्यांन मध्ये अभ्यासाची गोडी , चुरस राहिली नाही. घरात पालकांचा धाक नाही , शाळेतील शिक्षकांना मुलांना बोलण्याचा अधिकार नाही त्यामुळे हल्ली ची पिढी बिघडत चालली आहे. " आमची मुले बिघडली तरी चालतील पण त्यांना धाक लावायचा नाही, अशी आज पालकांची मानसिकता तयार झाली आहे."  " सर्व शिक्षण प्रणाली ढासळत चालली  आहे. असे असेल तर देश कसा सुधारणार? त्यात बी.एड, डी. एड झालेल्या पदवीधर शिक्षकांची  बेरोजगारी संख्या वाढत आहे.अशा शिक्षकाचा संस्था चालक मनमानी करून आर्थिक लूट करत आहेत. यात बरेच शिक्षक गरीब घरातून आलेले असतात. महागडे शिक्षण परवडत नसल्याने शिक्षण क्षेत्राकडे वळतात. लवकर शिक्षण पूर्ण करून घराला हातभार लावता येईल या विचाराने या क्षेत्रात येतात पण इथे ही त्याची घोर निराशा होत आहेआशा सर्व बाजूने शिक्षकांची परवड चालू आहे.
                हे सर्व थांबवायचे असेल तर संपूर्ण शैक्षणिक धोरणामध्ये सुधारणा करून बुध्दीमत्ता गुणवत्ता च्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. " विद्यादान चांगला विद्यार्थी घडवण्याचे काम फक्त शिक्षकांना द्यावे." सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांना अध्यापन करण्याचा योग्य मोबदला द्यावा , जेणे करून त्यांना पैशासाठी बाहेर क्लास घेण्याची गरज पडू नये. "  पूर्ण वेळ शिक्षक विद्यार्थ्यांना वेळ देऊ शकतील. यासाठी प्रशासन , शिक्षणमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून शिक्षकांची होणारी परवड थांबवावी.                     
सौ. प्रतिभा विभूते. पुणे.

Comments