निरागस मैत्री
दि:१३:०५:२०२५
आईस्क्रीम कथा स्पर्धेसाठी माझी कथा.
शीर्षक:निरागस मैत्री.
उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली नि घरात पाखरांचा किलबिलाट सुरू झाला. उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय करायचे याचा बेत मुले आखत होती. ए आई आपल्याला मामाच्या गावाला कधी जायचे आहे? देवांश तुणतुणे वाजवू लागला. तशी मीना ताई म्हणाली अरे जायचे आहे रे, जरा थांब ना,कालच तर सुट्टी लागली आहे. सर्वजण मामाच्या गावाला जाण्यास आतुर झाले होते. तिकडे मामाच्या घरी ही असेच प्रश्न चालू होते.कधी येणार मीना ताई,देवांश.कारण सर्व भावंडे एकत्र आली की धमाल व्हायची.चिंच,करवंदे,कैऱ्या गोळा करायच्या,त्याच बरोबर थंडगार आईस्क्रीम,बर्फाचा गोळा.आहाहा! काय मज्जाच मजा ! मस्त धमाल करू या. असा बेत प्रत्येकाच्या मनात आखला जात होता.
दोन दिवसांनी मामाचा फोन आला.कधी येताय मंडळी इकडे. आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही तयारच आहोत रे मामा ,देवांश पटकन बोलला. हो हो ये बेटा,तुझीच वाट बघतेय सायली, नीतू. त्यांना ही सुट्टीत धमाल करायची आहे.इकडे रानमेवा तयार आहे म्हणून त्याची चव घेण्यासाठी सर्वजण आतुर झालेली आहेत. मामाचा फोन आला नि आईने जायची तयारी केली. बोलता बोलता मावशी नि मावस भावंडं पण परवा येणार असल्याचे समजले. देवांशचा पाय तर जमिनीवर राहत नव्हता. कधी एकदा मामाकडे जातो असे त्याला झाले होते.त्यामुळे तो आईला सारखा विचारत होता आई तुला काही मदत करू का? एरवी एखादे काम सांगितले की किती बहाणा करतो देवांश,आज मात्र स्वतः हून आईला मदत करू का?असे विचारत होता. तसे ताई चेष्टेने म्हणाली देवांश तू नाही येणार आमच्या बरोबर हं,अरे बाबा इथे एकटेच आहेत ना? तू तर बाबांचा लाडका ना? मग तू थांब बाबांसोबत इथे. मी नि आई जातो मामाच्या गावाला. काय बोलावे? असा देवांश विचार करत होता. खरच आपले बाबा इथे एकटे राहणार,आम्ही सगळे गेलो तर बाबांची काळजी कोण घेणार? काय करावे? असा विचार करत असताना त्याला काही तरी आठवून तो म्हणाला आपण बाबांना ही सोबत घेऊन जाऊ म्हणजे खूप मजा करता येईल.यावर सर्वजण हसत म्हणाले अरे बाबांचे ऑफीस चालू आहे ना? बाबांना थोड्याच सुट्या लागल्या आहेत,ते ऑफिस सोडून कसे येणार रे? अशा गप्पा करता करता आईने मामाच्या गावाला जाण्याची तयारी केली.
दुसऱ्या दिवशी देवांश,ताई नि आई मामाकडे गेले. मामाच्या घरी अगोदरच मावशी व तिचे मुले आली होती. सर्व आते भावंडं, मामे भावंडं एकत्र आले.सर्वांना एकमेकांना भेटून खूप आनंद झाला.घरात मुलांचा नुसता दंगा चालू होता. लगेच आज काय काय करायचे त्याचे बेत सुरू झाले. देवांश मामाचा फार लाडका भाचा होता.मामा म्हणाले काय देवांश आज कुठे जायचे बाळा.तसे मामी म्हणाली " अहो आजच तर आले आहेत थोडा आराम करू द्या त्यांना,नंतर सुट्टी भरपूर आहे." मग जाऊ या ना कुठे तरी. तेवढ्यात देवांश म्हणाला नाही मामी " मी काही थकलो नाही ग,आम्ही गाडीत झोपून आलो आहोत. "आज आपण सगळेजण मस्त आईस्क्रीम खायला जाऊ " हे तर देवांश चे सर्वात आवडते खाणे. उन्हाळ्यात आईस्क्रीम ची मजा काही वेगळीच असते.झाले मामाने होकार दिला.आज संध्याकाळी सर्व मंडळी तयार रहा.आपण आईस्क्रीम खायला जाऊ. सर्व मुले आनंदून गेली. कधी एकदा मामा घरी येतो नि आपण आईस्क्रीम खायला जातो असे देवांश ला झाले होते.
ठरल्या प्रमाणे मामा घरी आल्यावर सर्वजण बाहेर जाण्यास तयार होते. सर्वजण आमृही आईस्क्रीम पार्लर मध्ये गेलो तेथे नाना प्रकारच्या फ्लेवर मध्ये आईस्क्रीम ठेवले होते. प्रत्येक मुले अधाशी सारखे काचेच्या पेटीत ठेवलेल्या आईस्क्रीम कडे बघत होती.एवढ्यात देवांशचे लक्ष दुकानाबाहेर एका छोट्याशा मुलाकडे गेले.तो सारखा दुकानात वाकून बघत असताना त्याला दिसला. बिचारा गरीब घरचा दिसत होता. कारण त्याचे कपडे खूप मळलेले दिसत होते.तो पुन्हा पुन्हा आईस्क्रिम खाणाऱ्या मुलांकडे बघून जिभली चाटत होता.देवांश एकटक त्याकडे बघत होता. इतक्यात तो हळूच उठला नि त्या मुलाच्या जवळ गेला.त्याला पाहून गरीब मुलगा घाबरला. तिथून पळायला लागला.तसा देवांश त्याला म्हणाला " अरे दोस्ता पळतोस का बरे? काय केले आहेस का तू?" तसा घाबरून तो मुलगा म्हणाला " काही नाही रे ,मी फक्त हे मुले आईस्क्रिम कशी खातात नि कसे आनंद घेतात हे बघत होतो." मग तू पळत का होतास ? देवांश बोलला. मी घाबरलो ,मला वाटले तू मला रागावशील ,मारशील म्हणून मी पळत होतो.आता नाही बघणार मी असा वाकून. असे म्हणत गरीब मुलगा रडू लागला. देवांश ला खूप वाईट वाटले.तो म्हणाला घाबरू नकोस,तू मला तुझा मित्र करशील का? मला खेळायला खूप आवडते.आपण दोघे मित्र होऊ आणि हो तुला आईस्क्रीम आवडते का रे? गरीब मुलाने लगेच मानेने होकार दिला.देवांश म्हणाला " अरे मला पण आईस्क्रीम खूप आवडते.आपल्या दोघांची आवड सारखीच आहे ". तो गरीब मुलगा म्हणाला पण मी खूप गरीब आहे.माझी आई मोलमजुरी करते.तिच्याकडे पैसे नसतात रे, मग ती कशी मला आईस्क्रीम घेऊन देणार? मला बाबा नाहीत,आईला एकटीला काम करावे लागते असे म्हणून तो परत रडू लागला.त्याचे रडणे ऐकून देवांशला वाईट वाटले. काय बोलावे हे त्याला समजत नव्हते. तसा तो खूप लहान होता पण आपल्याला जसे आईस्क्रीम आवडते तसे या आपल्या मित्राला ही आवडते हे त्याला समजले होते. तो लगेच त्याच्या जवळ जाऊन म्हणाला रडू नकोस तू माझा मित्र ना.थांब इथेच थोड्या वेळ. मी येईपर्यंत कुठे ही जाऊ नकोस. असे म्हणून देवांश परत दुकानात धावतच आला.
इकडे सगळेजण त्याला शोधत होते.आई काळजीने म्हणाली " हे काय रे ,कुठे गेला होतास?" तसा देवांश घाबरत म्हणाला. अग कुठे नाही इथेच बाहेर फिरत होतो. बाहेर किती छान बाग आहे.तिथे खूप मुले खेळत होती म्हणून ते पहात होतो. ताई रागाने बोलली.ये देवांश असा एकटा भटकू नको,कोणी नेईल बर का उचलून. नाही ग ताई मी असा एकटा बाहेर जाणार नाही. सर्व मुलांनी आपापल्या आवडीचे आईस्क्रीम घेतले नि आनंदाने खाऊ लागले. देवांशला मात्र त्याच्या गरीब मित्राचे बोलणे सारखे आठवू लागले." मला आईस्क्रीम खूप आवडते रे पण मी गरीब आहे ना? मला बाबा नाहीत." देवांश चे डोळे भरून आले होते.त्याला समजत नव्हते की हे आईस्क्रीम आपल्या मित्राला कसे नेऊन द्यावे.तरी तो आईस्क्रीम खात आहे असे नाटक करत होता.सर्वजण गप्पा गोष्टीत रमले होते. देवांशचे आईस्क्रीम वितळायला सुरू झाले होते. कोणाचे लक्ष नाही हे पाहून त्यांनी आईस्क्रीमचा कोन उचलला नि हळूच तेथून पळ काढला.जिथे त्यांनी त्याच्या गरीब मित्राला बसवले होते तिथे तो धावतच गेला.तो बिचारा तेथे बसून होता. देवांशला बघताच मित्र आनंदला. हे घे आईस्क्रीम, तुला आवडते म्हणून मामानी दिले आहे.हे ऐकून गरीब मित्राच्या डोळ्यात पाणी आले. "खरच तुझ्या मामानी माझ्यासाठी आईस्क्रीम दिले आहे." खात्री करून घेण्यासाठी मित्रानी विचारले.अरे हो हो ! माझे मामा खूप चांगले आहेत. माझा ते खूप लाड करतात. त्यांनीच सांगितले तुला आईस्क्रीम देऊन ये म्हणून. आता प्रश्न विचारू नकोस.खा बरे पटकन नाहीतर वितळून जाईल बघ. गरीब मुलाने आईस्क्रीम तोंडाला लावले नि कित्येक दिवसापासून इतर मुले कशी आईस्क्रीम खात आनंद घेता याची अनुभुती घेऊ लागला. थंडगार आईस्क्रीमचा स्पर्श जणु स्वप्नात असल्यासारखा तो अनुभवत होता. बिचारा! किती तरी दिवसांनी आईस्क्रीम खाण्याची इच्छा त्याची आज पूर्ण होत होती. त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद ओसांडून वाहत होता.किती छान आहे हा मुलगा,याने माझी मनातली इच्छा पूर्ण केली आहे.कोण असेल हा? का देवानेच याला माझ्याकडे पाठवले असेल? कारण मी रोज देवाला माझी इच्छा सांगायचो.तूच माझी इच्छा पूरी कर आणि आज माझी इच्छा या मुलाने पूर्ण केली. देव खरच या पेक्षा वेगळा असणार नाही. हा विचार करत तो आईस्क्रीम खात होता. गरीब मुलाच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. आईस्क्रीम मिळाल्याच्या आनंदात त्याला एवढे ही भान नाही राहिले की देवांश ने आईस्क्रीम खाल्ले का नाही हे विचारण्याचे.तो जेव्हा भानावर आला तेव्हा हात जोडून म्हणाला तू तर कृष्ण सखा वाटतो आहेस रे.जो माझ्यासारख्या भिकार मुलाला आपला मित्र बनवले व माझी आईस्क्रीम खाण्याची इच्छा पूर्ण केलीस पण मी मात्र चुकलो रे. तू आईस्क्रीम खाल्ले का नाही हे सुद्धा तुला विचारले नाही.फार स्वार्थी वागलो का रे? त्याचा चेहरा परत उदास झाला. तसा देवांश म्हणाला अरे मी तर दोन आईस्क्रीम खाऊन आलो.मग मामाला सांगितले माझ्या मित्रासाठी एक आईस्क्रीम देतो का? तर मामाने लगेच एक आईस्क्रीम तुझ्यासाठी दिले.माझा मामा खूप छान आहे. न राहून त्या मित्राने देवांश ला मीठी मारली.त्याक्षणी त्याला कृष्ण सुदाम्याच्या भेटीची आठवण झाली. हा खरच कृष्ण सखा असेल का? या मुलाच्या रूपात आला आहे? देवानेच याला पाठवले असणार,माझ्या मदतीसाठी. असे अनेक विचार त्या गरीब मुलाच्या मनात येत होते. तेवढ्यात देवांश ,देवांश करत त्याचा मामा,आई,ताई धावतच तिथे आले. समोरचे दृष्य पाहून सर्वजण भारावून गेले होते. देवांश किती प्रेमाने त्या मुलाला आईस्क्रीम खाऊ घालत होता. क्षणिक वाटले ही कृष्ण,सुदाम्याची जोडी तर नसावी. सर्वजण कौतुकाने समोरचे दृष्य पहात होते.
मामा देवांश जवळ येत म्हणाला " का रे लबाडा,खोट बोलतोस? तू दोन आईस्क्रीम खाऊन आलास? कोणी दिले होते रे तुला आईस्क्रीम ? मामा म्हणत देवांश मामाच्या कुशीत शिरला. आज मामाला आपल्या भाच्याचे खूप कौतुक वाटत होते.एवढा लहान वयात याला एवढी माणुसकीची जाण कशी काय आली हा विचार करत होते. याचे सर्व श्रेय ते आपल्या बहिणीने केलेल्या चांगल्या संस्काराला देत होते.आईने ही देवांशला जवळ घेतले नि म्हणाली.हे बघ देवांश तू जी केले ती खूप चांगली गोष्ट आहे.आपल्या मित्रांना ,गरीब लोकांना मदत जरूर कर.हे खूप चांगली गोष्ट आहे पण हे करताना घरातील मोठ्या माणसाला सांगून कर.अरे तू आम्हाला बोलला असतास तर आम्ही स्वतः त्याला इकडे बोलावून आईस्क्रीम खायला दिले असते. त्यासाठी तुला खोट बोलण्याची गरज नव्हती. तू गरीबांच्या बद्दल प्रेम ,माया करतोस हे खूप चांगली गोष्ट आहे पण तू खूप लहान आहेस.हीच गोष्ट आईला सांगू केलीस तर आई नाही म्हणणार नाही. देवांश आईला म्हणणे पटले आपण खरच आई,मामाला सांगायला हवे होते असे देवांशला वाटले तसे तो म्हणाला " मी परत खोट नाही बोलणार कधी ही " आई मला माफ कर ग, माझे लाडके बाळ म्हणत आईने त्याला घट्ट मिठी मारली.
त्या दिवसापासून देवांश जेव्हा ही मामाच्या गावाला येत असे तेव्हा तेव्हा मामा त्याच्या गरीब मित्राला ही सर्वांसोबत आईस्क्रीम खाण्यास नेत असे. ही निरागस मैत्री खरे तर आईस्क्रीम मुळे झाली होती. त्यात निरागसता होती, शांत, सोशीक,प्रेमळ भावना होती. विशेष म्हणजे गरीब मित्राचे मन ओळखण्याची समज देवांश मध्ये आली होती. निस्वार्थीपणे आपले आईस्क्रीम आपल्या मित्राला देण्याचा मनाचा मोठेपणा एवढ्याशा जीवाला समजला होता.आईचे तर अभिमानाने उर भरून आले होते. आज काल मुले किती हट्टी असतात तसा देवांश खोडकर होता पण तेवढाच मायाळू होता. त्यामुळेच घरात सर्वांचा लाडका होता.आज तर ही "कृष्ण सुदामा जोडी " या आईस्क्रीम मुळे गावात प्रसिद्ध झाली होती. पुढे हे दोघे ही जीवलग मित्र झाले.यांची जोडी म्हणजे आईस्क्रीम सारखी हवी हवीशी वाटणारी, शांत ,मनाला गारवा देणारी निरागस प्रेम करणारी.जी आईस्क्रीम मुळे जमली होती.एक आदर्श असा मुलांना या मैत्रीने दिला होता.खरच ही लहान मुले किती मनमोकळ्या स्वभावाची असतात.त्यांना समजत नसतो ना वर्णभेद माहित,ना जात,धर्म,ना गरीब श्रीमंती. आगदी स्वच्छ खळखळ वाहणाऱ्या झऱ्या सारखे असते याचे मन.असे कोवळे मन नीट सांभाळण्याची जबाबदारी पालकांची असते. ज्यांच्यावर लहानपणा पासून चांगले संस्कार होतात ती मुले आयुष्याच्या कोणत्याच वळणावर बिघडत नाहीत. आजचा हा प्रसंग पाहून सर्वांना वाटले हे आजच्या कलियुगातले कृष्ण,सुदामाची मैत्री तर नव्हे ? प्रेमाने परत या रूपात भेटले आहेत. अशी ही सुंदर आईस्क्रीम वरून झालेली निरागस मैत्री.
✍️ सौ.प्रतिभा विभूते,पुणे.
Comments
Post a Comment