विनोदी पात्र राघव
दि:०७:०६:२०२५
कथा
शीर्षक:विनोदी पात्र राघव.
"व्यक्ती तितक्या प्रकृती " अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. रोजच्या जीवनात आपल्याला अशा अनेक व्यक्ती भेटतात ज्या इतरांपेक्षा वेगळ्या असतात.त्याचे दिसणे, वागणे, राहणीमान,रंगरूप,स्वभाव एवढेच काय पण त्यांचे बोलणे ही विचित्र वाटते. अशाच एका पात्राची कथा मी तुम्हाला सांगणार आहे.
त्यांचे नाव राघव, नाव तर रामाचे पण वागणे मात्र विक्षिप्त होते. तर हा राघव म्हटला तर खूप बोलणारा पण मतलबी.जेव्हा मूड असेल तर खूप गप्पा मारणार पण तोच मूड नसेल तर तोंडाला कुलूप लावून बसणारा. बर याचे राहणीमान मस्त. रूबाबदार चाल, कडक पेहराव, कधी कपड्यावर एवढीशी घडी सुद्धा पडलेली दिसणार नाही. स्वच्छ धुतलेले ,कडक इस्त्रीचे कपडे अंगावर असायचे. दिसायला सुंदर,राहणीमान चांगले,फार हुशार पण अहंकार ठासून भरलेला, माझ्या सारखे जगात कोणीच हुशार नाही एवढे खात्रीने सांगणारा हा एकमेव माणूस म्हणजे हा राघव.
घरात बहिण,भाऊ, आई, वडिल असून सुद्धा याचे कधीच कोणाशी सूत जुळले नाही.प्रत्येकाचा एकमेकांशी वाद चालायचा.कालांतराने मुलांचे लग्न झाले नि मुले वेगळी राहायला लागली. राघव चे ही लग्न झाले नि सुंदर ,सुशील,संस्कारी पत्नी स्नेहल त्याला मिळाली. जी त्याने स्वतःच निवडली होती.एकत्र कुटुंबात वाढलेली स्नेहल सासरी विभक्त कुटुंबात अवघडल्या सारखे राहू लागली.तिला आजूबाजूला नेहमी माणसे हवे होते.इथे राघव ला मात्र फक्त नवरा,बायको म्हणजे थोडक्यात राजाराणी चा संसार हवा होता. आई, वडिलांना हे माहित होते. त्यांनी राघवला स्वतंत्र संसार थाटून दिला. तो स्नेहल बरोबर उत्साहाने व आनंदाने राहत होता.
हळूहळू स्नेहलच्या लक्षात येऊ लागले आपल्या नवऱ्याचे वागणे.तिला माहित होते आपला नवरा रागीट,हेकट स्वभावाचा आहे. स्वत:चे म्हणणे खरे करणारा,गपीष्ट होता राघव. त्याला कोणाचे आपल्या घरात राहणे पसंत नव्हते.
तरी स्नेहल नवऱ्याशी प्रेमाने ,आदराने वागायची त्याबरोबरच सासरच्या लोकांना ही प्रेम लावायची. सकाळ ते संध्याकाळ राघव ऑफिसमध्ये असायचा, संध्याकाळी सात च्या आत घरात येणे हा नियम त्याचा कायम होता.घरी आल्या आल्या बायको आपल्या सेवेला हजर असावी ही त्याची अपेक्षा.यात स्नेहल ला काही वावगे वाटत नव्हते पण कधी कधी अतिरेक वागणे झाले तर मात्र तिची चिडचिड व्हायची. या राघवचा थाट मात्र एखाद्या महाराजा सारखा असायचा. " घरात नाही दाणा नि बाजीराव म्हणा " ही म्हण त्याला बरोबर लागू पडत होती. जसे जसे मुले मोठी होत गेली तस तशी स्नेहल समजदार होत गेली. आपल्या नवऱ्याचा खरा स्वभाव तिला समजू लागला. स्वार्थीपणा, दिखाऊ,बड्या बड्या बाता नि स्वतःची हुशारी मिरवण्यातच याचा दिवस जात होता. बायको फक्त याची गरज होती.तिच्या बद्दल प्रेम,माया याचा लवलेश ही या माणसात नव्हता. तरी मुलांच्या प्रेमासाठी नि संसार उघडा पडायला नको म्हणून स्नेहल हे सर्व निमूटपणे सहन करत होती.
बघता बघता दिवस जात होते.मुलीचे व मुलाचे दोघांचे लग्न स्नेहलच्या पुढाकाराने पार पडले.नशिबाने नि स्नेहलच्या माणुसकी मुळे दोन्ही मुलांना उत्तम जोडीदार मिळाले.मुलगा,मुलगी आपापल्या संसारात खूष होते. आता तर राघव ला काहीच काम नव्हते.मी मुलांना उच्च शिक्षण देऊन कसे छान घडवले हे सांगण्यात त्याचे दिवस जात होते. कधी कधी तर स्नेहल चिडून जायची.हे काय दिवसभर मोबाईल घेऊन बसता.कधी कधी तर राघव कोणाशी बोलता नि काय बोलतो हे घंटा भर ऐकले तरी कुणाच्या बापाला समजायचे नाही हा नक्की कोणाशी नि काय बोलतोय.बोलणे पण एवढे थाटात असते की जसा एखादा आमदार,खासदार बोलतोय. हा त्याचा एक नमुना
हॅलो हॅलो अरे काय ? कुठे आहेस? कधी फोन करायला जमत नाही वाटतो.हं हं मी केल्यावरच तुला सुचत का? आरे साल्या... मी चार फोन तुला केले पण एकदा ही फोन उचलला नाही. तुला माहित आहे का? समोरचा काय? हे अंदाजे आपण समजायचे.अरे त्या गण्याचे... हो हो माहित आहे.मग मला कळवायला नको का? मला मण्याचा आता फोन आला ,असे असे झाले आहे तेव्हा कळले. एवढे ऐकून सुद्धा तुम्हाला काही कळले का? फोन कोणाचा आहे? कशासाठी केला? स्नेहल लक्ष देऊन ऐकायची पण थांगपत्ता तिला लागत नव्हता. फोन पुढे सुरूच.राघव म्हणतो अरे काल रात्रीच त्याचा मेसेज मला आला होता, काही तरी जोक करत होता. आणि आज असे झाले.स्नेहलने अंदाज बांधला.बहुतेक एखादा मित्र गचकलेला दिसतो.तोच पुढचे शब्द तिच्या कानावर आले. राघव अरे देवा, माझ्याशी कधी मनमोकळे पणाने बोलला नाही. ही गोष्ट ही त्यांनी सांगीतली नाही.एक एक तास माझ्याशी गप्पा मारायचा.मित्रापाशी मन मोकळं करायला पाहिजे. स्नेहल ला ही वाईट वाटत होते नवऱ्याचा मित्र गेल्याबद्दल. नवऱ्याचे सांत्वन करावे म्हणून ती उठली नि पुढचे बोलणे तिच्या कानावर आले.आज नाही फोन करत मी त्याला तो जरा गडबडीतच असेल. स्नेहल जागीच थबकली.याचा अर्थ मित्र गेलेला नव्हता.मग त्याचे आई,किंवा बाबा असू शकता. तिने मनाला समजावले." पिकलं पान गळून पडणारच " जन्माला आलेला प्रत्येकजण जाणारच पण नवऱ्याचा दु:खवटा काही केल्या संपेना.फोन सुरूच होता पुढे. राणीने फोन केला म्हणे तुमचा मित्र रडत आहे. आता तुम्ही सांगा घरातले कोणी गेल्यावर तो रडणार नाही तर काय हसत बसेल. जवळपास एक तास फोनवर मित्रांशी बोलणे झाले पण शेवटपर्यंत कोण गेले? हे काही स्नेहल ला कळले नाही. वैतागून ती कामाला लागली. फोन वरचे बोलणे संपले वाटत असतानाच आपण उद्या सकाळीच निघू त्याला भेटायला हे स्नेहलच्या कानावर पडले. धन्य तो राघव नि धन्य त्याचे मित्र. असा हा राघव फोनवर बऱ्याच वेळा बोलायचा पण कशा बद्दल बोलतो हे कधी कोणाला कळायचे नाही.असो.
दुसरी गोष्ट अशी होती याला नातीगोती काहीच समजायची नाही.आतेभाऊ,मामेभाऊ, भाचा,मेव्हणा, साडू, व्याही असले नाती सांगताना कोणाचे नाते कुठे ही जोडायचा.समोरचा माणूस विचार करत बसायचा. हा माणूस काय बोलतो आहे नेमका.एकदा तर गंमतच झाली.स्नेहलच्या बहिणीची विहीन भेटली.या मनूच्या सासूबाई म्हणजे माझ्या बहिणीची विहीन अशी राघवला ओळख करून दिली. थोडे बोलणे झाले. नंतर मनू म्हणजेच स्नेहलच्या बहिनीचा जावई समोर आला. त्याची ओळख स्नेहल ने राघव ला करून दिली.काही दिवसानी हे राघव महाशय मनूला भेटले म्हणजे मेव्हणीच्या मुलीला तर म्हणतात कसे अग कालच तुझा भाऊ मला भेटला.खूप गप्पा मारल्या. ती विचारात पडली.माझा भाऊ कोणता? कारण तिचा भाऊ परदेशात होता.तरी राघवचा ठेका चालूच होता म्हणे तुझा मावस भाऊ असावा. मनूला काही लिंक लागेना. कारण स्नेहल तिची एकुलती एक मावशी, तिचे मुले म्हणजे राघवचे ही मुले.मग माझा मावस भाऊ कोणता? हा विचार करत असतानाच मनूचा नवरा तिला चल आता घरी जाऊया म्हणत जवळ आला नि राघव जोशात म्हणाला हा बघ तुझा भाऊ... हाच तर काल भेटला. सगळ्यांना काय बोलावे काहीच सुचेना. स्नेहलने तर डोक्याला हात मारून घेतला.
बिचारी स्नेहल,तिला खूप अपमान झाल्यासारखे व्हायचे.खरे तर स्नेहल राघव पेक्षा किती तरी सुंदर होती, हुशार होती पण मी पणाचा लवलेश ही तिच्यात नव्हता .त्यामुळे सर्वजण तिला खूप मान देत असत. एखादी चांगली गोष्ट स्नेहल ने केली की त्याचे श्रेय मात्र हे राघव महाराज घ्यायचा तयार असायचे.एकदा राघवने बऱ्याच मित्रांना घरी जेवायला बोलावले होते.त्याबरोबर काही मित्रांच्या बायका ही आल्या होत्या.स्नेहल तशी स्वयंपाकात ही सुगरण होती.तिने मिसळपाव, गाजरचा हलवा,पुलाव नि आईसक्रीम असा छानसा बेत केला होता. सर्वजण जेवायला बसल्यावर मिसळपाव फार छान झाले बर का वहिनी, असे स्नेहल चे म्हणू लागले. वाह ! काय छान झाला हा गाजर चा हलवा.वाह भाई राघव,तुझी तर फार मजा आहे.असे छान पदार्थ बनवणारी बायको तुला मिळाली. असा कौतुक सोहळा मित्र परिवार करू लागलाच राघवचा मोठेपणा सुरू झाला. अरे मीच तिला सांगितले त्यात कोणकोणते मसाले घालायचे. सर्व मसाले घातले की मग बघ झणझणीत मिसळ होते.सर्वजण आश्चर्याने राघव कडे बघायला लागले. न राहून एका मित्राच्या बायकोने विचारले काय काय मसाले घातले यात सांगा राघव भाऊजी? मोठ्या थाटात राघव सांगू लागला थोडा सांबर मसाला,थोडा पावभाजी मसाला,बाकी लवंग ,मीरे टाकले म्हणून मिसळ छान झाली. आता बोला. काय अवस्था झाली असेल त्या ऐकणारांची. तोंड दाबून सारे हसत होती.
✍️ सौ.प्रतिभा विभूते,पुणे.
Comments
Post a Comment