टोपन नाव

                                                                       "टोपन नाव "
वडिल पोलिस खात्यामध्ये असल्यामुळे माझे सर्व बालपण पोलीस काँलनीतच गेले. येथे सर्व जाती, धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असे.कोणी काका, कोणी मामा तर कोणी बहीन भावाचे प्रेमाचे नातेसंबंध एकमेकांशी जोडलेले असायचे.आमच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला आम्ही मामा म्हणत. या मामाची छोटी मुलगी,छानशी , रंगाने सावळी पण तब्येतीने मात्र गुटगुटीत होती. आमच्या घरात नेहमी खेळण्यासाठी येत असे. एकदा सहज माझ्या वडिलांनी तिला " ढम्मी " म्हणून हाक मारली तर त्या दिवसापासून तिला सर्व जण ढम्मी या टोपन नावाने बोलवत असत.तिचे खरे नाव पोलीस काँलनी मध्ये कोणालाच माहित नव्हते. तर असे हे टोपननाव .कधी कोणी प्रेमाने ठेवते तर कधी सहजपणे एखादाला मिळते. आहो एवढेंच काय एखाद्याला चिडवण्यासाठी सुध्दा अशी " टोपननाव " ठेवली जातात. उदाहरणा दाखल ढबू , मोटू ,छोटू , बिट्टू , चिनू तर मुलीमध्ये पिंकी ,चिंकी ,रिंकू ,गुड्डी, मुन्नी असे अनेक टोपननाव ठेवली जात असत.
आमच्या नातेवाईकामध्ये एका मुलाला सर्व जण तंगू म्हणतात आम्हाला नाव ऐकल्यावर फार आश्चर्य वाटले. सहज चौकशी केल्यावर कळले याचे कारण काय तर विटीदांडू खेळताना जेव्हा त्या मुलावर राज्य असायचे त्या वेळेस इतर मुले त्याला फार तंगवायची.त्या वरून त्याचे नाव " तंगू " असे पडले.आमच्या शेजारी राहणाऱ्या मुलाचे नाव " गोट्या ".एके दिवशी मी सहज त्याला विचारले,तुझे गोट्या नाव कुणी ठेवले. तसा तो थोडा लाजत म्हणाला " मी लहानपणी खूप गोट्या खेळत असे म्हणून सर्व जण मला गोट्या म्हणूनच हाक मारू लागले.शाम शुभम् दोघे भाऊ ,शुभम् मोठा तर शाम छोटा होता. शाम लहान असल्याने त्याला निट बोलता येत नव्हते. तो मोठ्या भावाला बोलवतांना शुभंम् म्हणता फक्त भंम् म्हणत असे.त्यामुळे घरचे लोक ही मजेने भंम् म्हणायला लागले. पुढे हेच शुभमचे  टोपननाव पडले.
 एकदा ओळखीतला मुलगा बर्याच वर्ष्याने आम्हाला भेटला.समोर त्याला पाहून खूप आनंद झाला. कसा आहेस रे पिंट्या ? त्या बरोबर तो म्हणालामी मजेत आहे पण प्लीज काकू आता  लग्न झालं आहे माझं ,निदान बायकोसमोर तरी मला पिंट्या म्हणू नका. आता त्याला कसे सांगणार होते मी त्याचे खरे नाव काय होते ते मला आठवत सुध्दा नव्हते.आमच्या सोसायटी मध्ये एक भाडेकरू राहायला आले होते. त्याना एक मुलगा मुलगी होती. मुलांची ओळख झाल्यावर सहज नाव काय आहे हे विचारल्यावर त्याने ढबू असे सांगितले. सर्व मुल त्याला चिडवायला लागली. पण ढबूला मात्र त्याच  काही वाटले नाही. तो जेव्हा बाहेर येत असे तेव्हा त्याची आई त्याला जोरात ..ढबू... असे ताल धरल्या सारखे हाक मारायची, तेव्हा बाकीची मुल ही ..ढबू... म्हणत त्या बाईची नक्कल करायचे.तर असे हे मजेशीर टोपननाव .हे ऐकतांना मात्र इतरांची करमणूक व्हायची
 असाच आमच्या काँलनी मध्ये राहणाऱ्या  एका मुलाला सर्व जण " काशीबोर " म्हणून चिडवत असत.कारण काय होते मला माहित नाही पण तो मुलगा काशीबोर म्हटलं की खूप चिडायचा.मग इतर मुल त्याच्याशी भांडण झाले की त्याला राग यावा म्हणून मुद्दाम काशीबोर म्हणायला लागले.पुढे त्या मुलाचे हेच टोपननाव पडले.माझ्या वडिलांनचा स्वाभाव खूप चेष्टा मस्करी करणारा असल्यामुळे त्याचे सहकारी मजेने त्यांना " राया " म्हणत असे.काही लोकांना मात्र असे वाटत होते की आमचे आडनाव "राया "आहे .मग ते आईला राया बाई म्हणू लागले ,तेव्हा आईला सर्वांना सांगावे लागले राया हे आमचे नाव नाही .हे माझ्या पतीला त्याच्या सहकार्याने  चेष्टेने दिलेले टोपन नाव आहे. तरी कृपया मला रायाबाई म्हणत जाऊ नका
लहान असतांना पडलेली टोपननाव काही लोकांना मोठी झाल्यावर आवडत नाहीत. पण माझ्या धाकट्या मुलाने मात्र हक्काने टोपननाव मागून घेतले होते.तो किस्सा असा झाला ,मी एकदा माहेरी गेले होते. तेथे शेजारी राहणाऱ्या लहान मुलाला त्याची आई लाडाने     " बिट्टू "म्हणत असे.एके दिवशी माझ्या लहान मुलांने ते ऐकले घरी येऊन लाडाने मला म्हणाला " मम्मी तु पण मला बिट्टू म्हणत जा ना" त्याचे ते लाडिक बोलणे ऐकून आम्हाला खूप हसायला आले.मग मी त्याला बिट्टू म्हणून हाक मारली तर तो एवढा खूष झाला की विचारायला नको.पुढे सहज म्हणता म्हणता तो आमचा  नेहमी साठीच बिट्टू झाला. आता त्याचे लग्न झाले आहे तरी त्याने लाडिकपणे मागितलेले टोपननाव आज ही त्याला हाक मारतांना आम्ही वापरत आहोत.तर असे हे " टोपननाव " माणसाला लेबल प्रमाणे चिकटलेले असतात.अहो लेबल कधीतरी निघून ही जाईल पण एकदा चिकटलेले " टोपननाव " मात्र व्यक्तीला कायमस्वरूपी चिकटून राहतात
कधी रंगरूपावरून, कधी चेष्टेने, तर कधी एखाद्याच्या सवयी मुळे आणि हो कधी कधी प्रेमाने मागितल्याने सुध्दा टोपननाव मिळाली आहेत. मजा वाटली ना असे टोपननावे वाचून.मला तर खूप मजा आली लेख लिहीताना. तुम्ही ही बघा.तुमच्या आसपास एखाद्या ला असेच मजेशीर टोपननाव मिळाले असेल.
धन्यवाद!

 सौ. प्रतिभा विभूते.

Comments

Post a Comment