दैव जाणिले कुणी

                                                              " दैव जाणिले  कुणी  "
 सकाळच्या प्रसन्न वेळी रेडिओ वर गाणे चालू होते. " लव  कुशाचा हलवी पाळणा , ऋषी वाल्मिकी मुनी हो , दैव जाणिले कुणी" हे गाणे ऐकत असताना माझ्या मनात विचार आला. "खरच दैवाचा खेळ कधी कुणाला चुकला आहे का?" विधात्याने भाळी लिहीलेले " विधिलिखित "कोणी कधीही टाळू शकत नाही. या विचारांने माझ्या मनात जुन्या आठवणी ताज्या झाल्या.पाच वर्षापूर्वी आमच्या ओळखीतले गृहस्थ देशमुख यांची  फाँरेस्ट आँफीसर म्हणून नाशिकला  बदली झाली.   स्वभावाने अतिशय शांत , सज्जन होता हा माणूस ,नेहमी लहान मोठ्यांचा आदर करणारे हुशार गृहस्थ होते.दोन मुली ,दोन मुल अस व्यवस्थित कुटुंब असून आर्थिक परिस्थिती उत्तम होती. नाशिकला बदली झाल्या मुळे देशमुख साहेबांना खूप आनंद झाला. कारण नाशिक  हे फक्त तीर्थक्षेत्र नव्हते तर औद्योगिक दृष्टीने ही सुधारलेले शहर आहे.देशमुख  यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले होते तर बाकीचे मुले शिक्षण घेत होते. असे हे सुखी कुटुंब होते.
 पण अचानक एखादी नैसर्गिक आपत्ती येऊन होत्याचे नव्हते होते तसेच काही देशमुख कुटुंबाचे देखील झाले होते. काय झाले  ? या सुखी कुटुंबाला कोणाची दृष्ट लागली  कोण जाणे? पण देशमुख बाई सारख्या आजारी पडू लागल्या. मोठ्या मुलीच्या सासरी काही अडचणी सुरु झाल्या होत्या. आता घर म्हटले की अनंत अडचणी असणारच पण दैव फिरले की सगळे फासे उलटे पडतात. तसे काही देशमुख बाईच्या बाबतीत घडले .सासरी गेलेल्या मुलीच्या काळजी स्वतः हाचे आजारपणाला कंटाळून देशमुख बाईने नाशिकच्या गंगेत उडी घेऊन " आत्महत्या " केली.भरला संसार अर्ध्यावर सोडून बाई  परतीच्या निघाल्या. या अपघाताने संपूर्ण कुटुंब कोलमडून गेले." संसार रूपी रथाचे एक चाक  निखळून पडले होते. आयुष्याची जोडीदारीन सोडून गेल्यामुळे देशमुख साहेब मनाने पूर्ण खचले होते पण स्वतः चे दुःख दुर करून मुलांनसाठी ते खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न करत होते. कारण आता ते फक्त मुलांचे वडीलच नव्हते तर आईची भूमिका ही त्यांना पार पाडावी लागणार होती.कुठल्याही दुःखावर काळ जाणे ,हाच उपाय असतो.
काही दिवसांनी देशमुख साहेबांचा मोठा मुलगा अजय याचा  बारावीचा निकाल लागला. तो चांगल्या मार्काने पास झाला. पुढे त्याचा इंजिनिअरिंग साठी पुण्याला नंबर लागला. या आनंदाच्या क्षणी आईची आठवण येणे साहजिकच होते पण वडिलांना दुःख वाटू नये म्हणून मुलगा स्वतः ला सावरण्याचा प्रयत्न करत होता.नंतर काही दिवसांनी आईचे वर्षे श्राद्ध होते त्या साठी सर्व जण एकत्र नाशिकला घरी आले.आईविना पोरके झालेले मुल पाहून सर्वांना हळहळ वाटत होती.आईच्या वर्षश्राध्दाचा कार्यक्रम आटोपून अजय परत पुण्याला गेला. आपल्या मित्रांसोबत राहून दुःख  कमी करण्याचा प्रयत्न करत होता. मित्रही त्याला सांभाळून घेत होते. काही दिवसांनी रंगपंचमी सण आला.सगळेजण रंगपंचमी साजरी करत होते. अजयने  पण मित्रानं सोबत रंगपंचमी साजरी केली. रंग खेळून झाल्यावर  अजय त्याचे सर्व मित्र अंघोळीसाठी कँनाल वर गेले. कँनालला पाणी सोडलेले होते. अंघोळीसाठी सर्व जण पाण्यात उतरले पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे अजय पाण्यात वाहून गेला. बाकी सर्व मुले सुखरुप होते ,पण दुदैव असे की  अजय बेपत्ता झाला होता. " सगळं जग रंगपंचमीचा आनंद लुटत असतांना देशमुख यांच्या घरात मात्र रंगाचा बेरंग झाला होताअचानक दुपारी चार वाजता नाशिकला घरी फोन आला, ' अजय  आजारी आहे , ताबडतोब निघून येणे .
देशमुख साहेब लगेच पुण्याला गेले  पण तो पर्यंत सर्व संपले होते .नशिबाने त्यांना अजून जबरदस्त धक्का दिला होता. ते पुण्याला पोहचले तेव्हा मृतदेहाचा शोध चालू होता. रात्री दोनच्या सुमारास मृतदेह सापडला .या घटनेनंतर देशमुख साहेबांना  जबरदस्त धक्का बसला होता. एखाद्या निर्जीव वस्तूसारखी त्याची स्थिती झाली होती." नियतीने तिचा क्रूर डाव साधला होता " सगळे मुल पोहत असताना अजय वाहून जावा ,ही खरच दुदैवी गोष्ट होती पण म्हणतात ना " नशिबात असेल ती गोष्ट कोणी टाळू शकत नाही ". विशेष म्हणजे मुलाचा आईचा मृत्यू पाण्यामध्येच झाला होता. पत्नीच्या वर्षश्राध्दानंतर  बरोबर एक वर्षानेच मुलाचे वर्षश्राध्द करण्याची वेळ देशमुख साहेबावर आली होती. सर्वानां खूप वाईट वाटले.आम्ही सर्वानी देवाजवळ एकच प्रार्थना केली " परमेश्वरा कुटुंबाला या धक्क्यातून  सावरण्यासाठी ताकद दे. " खर तर अशी वेळ  वैर्यावरही येऊ नये पण नशिबाचा भोग कोणाला चुकला आहे का? रेडिओ वरचे गाणे संपले होते पण " दैव जाणिले कुणी " हे गाणे ऐकताना ही घटना काल परवा घडल्यासारखी माझ्या डोळ्यांसमोर येत राहीली.
( ही घटना सत्य घटनेवर आधारित आहे. फक्त यातील नावे काल्पनिक आहेत.)
 धन्यवाद !

सौ. प्रतिभा विभूते.

Comments