जीवनातील खरेपणा

 काल माझ्या मैत्रीणींच्या घरी पूजा असल्यामुळे आम्हाला तिच्या घरी बोलावले होते.पूजा झाल्यावर भजन झाले.भजन ऐकण्यासाठी आलेल्या सीताकाकूंनी खूप छान भजन म्हटल त्यावर  व्याख्यान दिले.सर्वजण खूप खुष झाले.आम्ही घरी आलो पण त्या गाण्यावर ऐकलेले व्याख्यान मात्र मला सारखे विचार करायला लावत होते. " जीवनातील  खरेपणा किती  विचार पूर्वक गीतकारांने या गाण्यामध्ये लिहीला होता. हे गाणे मी प्रथमच ऐकले होते पण ऐकताक्षणी ते मला खूप आवडले होते. ते गाणे होते.....
                                   "एक डोली चली ,एक अर्थी चली
                                    डोली अर्थी से यू कुछ कहंने लगी
                                    रस्ता तुने मेरा क्यूं खोटा किया।
                  सामने चली जा, दिल जली "                       
सीताकाकूंनी व्याख्यानाला सुरवात केली.त्या म्हणाल्या ,ही गोष्ट त्यावेळची आहे ,जेव्हा एकाच गावात या दोन्ही घटना एकाच वेळी घडलेल्या असतात. पहिली घटना घडते ती आनंदाची असते.मुलीचे लग्न होऊन ती सासरी जायला निघालेली असते.तिची डोली घरातून निघालेली असते. त्याचवेळी दुसर्या घरात दुःखद घटना घडलेली असते.घरातील सूनेचा मृत्यू झाल्यामुळे तिची अर्थी अंतयात्रेसाठी निघालेली असते. योगायोगाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा दोघींची भेट एका चौकात  होते. डोली  अर्थीला बघते अर्थी डोलीला. असे समोरा समोर भेट होणे हे डोलीला अपशकुन झाल्यासारखे वाटते. जर अर्थी दिसल्यावर अपशाकुन होत असेल तर  बरेच लोक अर्थी  पाहिल्यावर हात जोडून नमस्कार करताना मी अनेक वेळा पाहिले आहे. आपण नेहमी मोठ्यांना नमस्कार करतो पण आपल्या पेक्षा लहान व्यक्तींचा जरी मृत्यू झाला असेल तरी सर्वजण शेवटी प्रदक्षिणा घालून त्या अर्थी ला नमस्कार करतात. ह्याचे कारण काय आहे? हे मला माहित नाही पण एकदा शेजारच्या काकूला मी विचारले, "प्रेत चालले असेल तर लोक त्याला नमस्कार का करतात? तशा काकू म्हणाल्या,आपण त्या व्यक्तीला नाही नमस्कार करत तर त्या व्यक्तीमधला  आत्मा असतो तो अनंतामध्ये विलीन होण्यासाठी चालला आहे त्याला नमस्कार करतो आपण. खरतर यामधले मला फार काही समजले नाही पण एवढे मात्र नक्की समजले की असे प्रेत समोर भेटले तर अपशकून वगैरे काही होत नाही.
                तेव्हा डोली आणि अर्थी एकमेकींच्या समोर आल्यावर अर्थी डोलीला पाहते डोली अर्थी.त्या दोघी मध्ये जो संवाद झाला त्याचे सुंदर वर्णन या गाण्यात ऐकायला मिळाले.जेव्हा दोघी समोरा समोर भेटतात तेव्हा डोली अर्थी ला म्हणते, ताई तू हे चांगले केल नाहीस. मी तर शुभकार्यासाठी चालले आहे.तू माझ्या रस्त्यांमध्ये असे आडवे येऊन माझे शुभकार्य अशुभ केल आहेस. हे ऐकल्यावर अर्थी डोलीला म्हणाली, सखे असे मोठे विचार सांगू नकोस. खर तर तुला माहित नाही. आज  मी जिथे चालले आहे , तिथे उदया तुला ही यावे लागेल. हे तू माहित करुन घे. तू स्वतः ला  खूप मोठी समजते आहेस ना?  तर मग ऐक. तू जशी आहेस तशीच मी पण आहे . मी अस काय केले आहे? ज्यामुळे तुझे शुभकार्य असे अशुभ झाले आहे म्हणे. अग तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही, तो कसा तर नीट ऐक.                       
अर्थी डोलीला म्हणाली बघ सखे , चारजणांनी तुझ्या डोलीला आधार दिला आहे तर चारजणांनी माझ्या ही अर्थीला आधार दिला आहे. तुझी डोली फुलांनी सजली आहे तर माझी अर्थी ही फुलांनी सजली आहे. अग या सुंदर,निर्मळ फुलांनी सुध्दा आपल्या दोघी मध्ये अंतर समजले नाही तर तू का समजतेस? हो पण एक फरक मात्र आपल्याला दोघीमध्ये आहे सखी तो म्हणजे तू माहेरच्या लोंकाचा निरोप घेऊन निघाली आहेस आणि मी जगाचा निरोप घेऊन चालले आहे. एवढे ऐकल्यावर ही डोलीचे समाधान झाले नाही.                       
 त्या नंतर अर्थी डोलीला म्हणाली सखी, हातभर हिरवा चुडा तू ही भरला आहेस आणि मी पण हातामध्ये हिरवाच चुडा भरला आहे. एवढेच काय दोघींच्या ही भांगामध्ये सिंदूर भरलेला आहे. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते तिला जेव्हा मरण येईल तेव्हा तिला आपल्या पतीच्या खादयांवरून जाता आले  पाहिजे. सवाष्ण जाणे हे प्रत्येक स्त्री ला भाग्याचे वाटते. तुझ्या कपाळी जसा कुंकवाचा मळवट भरला आहे तसाच माझ्या कपाळावर पण मळवट भरला आहे. अग माझ्या कपाळाचे कुंकू अनेक महिला आपल्या कपाळी लाऊन ,माझ्या सारखे सुहासिनी असतांना  मरण स्वतः ला येऊ दे म्हणून सदैव देवाकडे मागणे मागतात. सोळाश्रृंगार तू केला आहेस तसा मी पण केला आहे .एवढे सगळ असतांना तूझ्या नी माझ्यात अंतर का समजतेस? खर सांगू सखे मी अपशकुनी नाही .फक्त फरक एवढाच आहे आपल्यात ,"तू सासरी चालली आहेस आणि मी सासरहून अंत्ययात्रेसाठी निघाले आहे. इतके समजावून सुध्दा डोलीला अर्थी चे म्हणणे पटले नाही.
 तेव्हा अर्थी चिडून म्हणाली, एवढी घमेंड करू नकोस थोड समजावून घे .सखी बघ ,तुझ्या गोऱ्या हातावर जी मेहंदी लावली आहे तिच मेहंदी माझ्या हातावर लावली आहे. मेहंदी,मळवट,चुडा ,मंगळसुत्र हा साजशृंगार हे सर्व वैभव सवाष्णीबाईचे असते. हे सर्व तुला मिळाले आहे तेच मला पण मिळाले आहे.फक्त फरक एवढाच आहे की तू नवऱ्याबरोबर संसार करण्यासाठी चालली आहे आणि मी नवऱ्या बरोबर संसार करून चालले आहे म्हणून म्हणते डोली तू एवढा गर्व करू नकोस. स्वतः ला फार श्रेष्ठ समजू नकोस. अर्थी परत डोलीला समजावत म्हणाली,बघ बघ सखी तुझे पती तुला पाहून कसे हासत आहेत, खूश होत आहेत. कारण तू त्यांच्या जीवनात आनंद देण्यासाठी सासरी चालली आहेस आणि मी माझ्या पतीचे सर्वस्व घेऊन चालले आहे.त्यामुळे बघ ते कसे शोक करत रडत आहे.हाच आपल्या दोघीमधला फरक बघते आहेस ना?डोली तू तुझ्या पती बरोबर आनंदात सासरी चालली आहेस,मी मात्र माझ्या पतीला दु: सागरात लोटून त्याच्या पासून दूर चालले आहे.                       
 त्या नंतरही अर्थी म्हणाली बघया चार लाकडाची डोली तुझ्या साठी सजली आहे आणि चार लाकड वापरून माझी अर्थी पण सजली आहे.” हेच जीवनातील खरेपण आहे. “हे लाकूडच आपल्या जीवनातील खरेपणा निभावत आहे.जन्माला आलो तर पाळणा लाकडाचा ,चालायला शिकलो तर खेळणे लाकडाचे ,लग्न झाल्यावर डोली लाकडाची आणि आज ही माझी अंतिम यात्रा निघाली आहे ती पण लाकडाच्या अर्थी वरूनच.एवढ सगळ असून ही तुझ्या नी माझ्यात फक्त एकच फरक आहे तो असा तू याच लाकडा पासून बनलेल्या डोलीत बसून पती सोबत चालली आहेस आणि मी या लाकडाची रचलेल्या चितावर झोपून या अंनतामध्ये विलीन होण्यासाठी चालले आहे. सर्वांचा शेवटचा निरोप घेऊनखरच काकूंनी खूप सुंदर व्याख्यान दिले होते. आपण कधीही एवढा विचार करत नाही पण जीवनातील हे खरे तत्वज्ञान प्रत्येकांने जाणून घ्यावे. शकुन अपशकुन समजत " मृत्यू हे जीवनातील कटू सत्य आहे चुकणारी गोष्ट आहे " या गोष्टीचा स्वीकार सर्वांनीच केला पाहिजे.यासाठी हा लेख प्रपंच!                       

सौ .प्रतिभा मुकूंद विभूते.

Comments

Post a Comment