गुढी पाडवा, संवाद लेखन

दि: 

*संस्कृती दर्शन*

*गुढीपाडवा*

आजी ये आजी...

आजी:  काय रे आयुष?

आयुष :  अगं शेजारच्या काकू म्हणत होत्या उद्या गुढी पाडवा आहे. गुढीपाडवा म्हणजे काय गं?

आजी: अरे आयुष गुढी पाडवा म्हणजे महाराष्ट्रीय सण आहे आणि मराठी नवीन वर्षाची सुरवात या दिवसा पासून होते, समजले?


आयुष: या सणाला काय करता गं आजी ?

आजी : या दिवशी साडेतीन मुहर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी गुढी उभारतात.

 आयुष: गुढी म्हणजे काय गं आजी?

आजी : गुढी म्हणजे बांबू किंवा कळकाची मोठी काडी, याला रेशमी कपडा किंवा साडी नेसवून ,फुलांची हार,साखरेची माळ,कडुंलिबांची डहाळी नी तांब्याचा गडू पालथा ठेवून गुढी तयार केली जाते.

आयुष : आपण पण उद्या गुढी तयार करणार आजी?

आजी : हो हो!! आपला महाराष्ट्रीयन सण आहे हा.

आयुष : आजी गुढी का बरे उभारायची? काय कारण आहे?

आजी: थांब सांगते हं. प्रभू रामचंद्रानी याच दिवशी, वाली या दुष्ट राजाचा वध करून त्याच्या त्रासातून सर्व जनतेला मुक्त केले. तो आनंद साजरा करण्यासाठी घरोघरी गुढ्या उभारल्या होत्या आणि
 हो याच दिवशी प्रभू रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपवून
आयोध्येला परत आले . त्यांच्या स्वागतासाठी सर्व प्रजेने दारी सडा,रांगोळी, दाराला  आंब्याच्या पानांचे तोरण बांधून जोरदार स्वागत केले होते. हीच प्रथा पुढे चालू झाली. बरं का आयुष ! याचे अजून महत्व म्हणजे ही गुढी विजयाचे प्रतिक म्हणून उंचावर लाविली जाते.

आयुष: बाप रे !! आजी तुला तर सगळं माहित आहे. अजून सांग ना आजी.अगं हा कडू कडू पाला का बरे लावता?

आजी : अरे हो आयुष, बस येथे. मी तुला सगळं सांगते

हे बघ गुढीपाडवा ही प्रथा फार प्राचीन काळापासून चालत आली आहे.आपल्या लोक संस्कृती मध्ये गुढीपाडव्याला महत्वाचे स्थान आहे. हा दिवस चैत्र शुध्द प्रतिपदा शालिवाहन हा फार पूर्वी राजा होऊन गेला त्यावेळी पासून हे नवीन वर्षाची सुरूवात समजली जाते.या दिवशी सर्व शुभकार्य,खरेदी केली जाते.

आयुष : आपण पण खरेदी करू आजी.

आजी:  हो करूया. 

आयुष : अग पण तो कडूपाला...

आजी:  अरे हो तुला पूर्ण गुढीची माहिती सांगते.प्रत्येक गोष्ट करण्या मागे काही तरी शास्त्रीय कारण असते. आपले पूर्वज अतिशय हुशार होते.ते वातावरण,ऋतू प्रमाणे आहारविहार घ्यायचे. त्यामुळे पूर्वीचे लोक सृदृढ होते. 

आता हेच बघ, 
गुढीची काठी म्हणजे सामर्थ्य. ती जशी कणखर नी ताट उभी असते अशा ताठ मानाने आयुष जगावे हा संदेश यातून दिला जातो.

आयुष : अरे वाह! भारीच आजी.

फुले: फुले आपल्याला निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आहे. फुलांच्या वासामुळे तन,मन,परिसर प्रसन्न होते.
हळदी,कुंकू : हळदीकुंकू हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते.
श्रीफळ म्हणजे नारळ. नारळ वाढवून शुभकार्याची सुरवात करतात.

आयुष : आजी हा पाट का वापरता गं? 

आजी : पाट किंवा आसन हे आयुष्यात नेहमी स्थिर रहा.हा संदेश देण्यासाठी गुढीखाली पाट ठेवल्या जातो.
कडुलिंबाचा कोवळे पाने जिरे,ओवा,चिंच,गुळ,हिंग नी चवीपुरते मीठ एकत्र करून याचा प्रसाद गुढीला दाखवतात. हा प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा. बर का! 

आयुष : व्या व्या!! शी मी नाही असला कडू पाला खाणार आजी.

आयुष : अरे आजारी पडल्यावर कसे कडू औषध पितो तसे औषध समजून खाऊन घ्यायचे, समजले? 

आयुष : अग पण आजी मी कुठे आजारी आहे? मग कशाला...

आजी: अरे आजारी पडू नये म्हणून... आणि तुला माहित आहे का? कडुलिंबाचा पाने आरोग्यासाठी उत्तम मानली जातात.या पानांमध्ये शरीर निर्जंतुक करण्याची क्षमता असते. उन्हाळ्यात होणाऱ्या अनेक आजारापासून आपले संरक्षण व्हावे. याच हेतूने आपल्या पूर्वजांनी या पानांचा वापर प्रसादामध्ये केला आहे. जेणे करून हा प्रसाद  सर्वजण खातील. समजले. 

 आयुष : खरच आजी आपले जुने लोकं किती हुशार होते. मी खाईल उद्या हा प्रसाद.मला छान निरोगी राहयचे आहे.

आजी: अरे माझ्या सोनू.पटले ना आजीचे म्हणणे. 

आयुष: हो हो आजी.

आजी: ऐक आयुष, या कडू प्रसादा बरोबर तुला साखरेची  गाठी पण खायला देणार बरका! ही साखरेची गाठी सुध्दा औषधी आहे बरका.

आयुष : आता साखर कशी औषधी?

आजी : अरे ही गाठी उन्हात दिवसभर गुढीला घातलेली असते. हिचा वापर उन्हाळ्यात बाहेर कडक ऊन असते. त्यावेळी ऊन लागून ताप आला तर ही गाठी पाण्यात टाकून ते पाणी पिले तर ताप उतरतो. आहे का नाही मजा?

आयुष : हो ग आजी! सण साजरा करतांना किती गोष्टी शिकायला मिळाल्या मला. तू सांगीतले म्हणून एवढी माहिती मला  मिळाली. 

आजी: अरे राजा ! हेच तर आपल्या संस्कृतीचे वैशिष्ठ आहे. हे *संस्कृतीचे दर्शन*
पुढच्या पिढीला देण्याचे काम सहज संस्कारातून घडते.

आयुष: आजी उद्या काय जेवायला करणार?

आजी: तुझ्या आवडीचे श्रीखंड,पुरी...

आयुष : खरच... मला खूप आवडता आजी आपले असे सण. किती छान आहे हे सगळं. मी खूप मजा करणार
पण आजी ही गुढी किती दिवस राहणार?

आजी : अरे सूर्यास्त होण्या पूर्वी गुढी खाली घेतली जाते.तिला परत धणे नी गुळ याचा नैवद्य दाखवला जातो. धने शरीराला थंडावा देतात. पूर्वी उन्हाळ्यात बाहेरून  येणाऱ्या लोकांना गुळ नी पाणी देण्याची पध्दत आपल्या कडे आहे. यामुळे उष्णतेपासून आपल्या शरीराचे रक्षण व्हावे हाच उद्देश आहे. कळले का आता सगळे?

आयुष : हो हो आजी. किती छान आपली संस्कृती नि सणवार आहेत. मला खूप आवडतात. 

आजी : चला तर मग.लवकर झोप .सकाळी लवकर आवरून गुढी उभारायची आहे. 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
💐💐

संवाद लेखिका

सौ.प्रतिभा विभूते,
    पुणे.©️®️

Comments