खिडकी
आज महिला मंडळाचा दिवस. आजच्या मिटींगमध्ये खुली चर्चा होणार असल्याचे समजले. खुली चर्चा घेण्यामागे हेतू हाच असतो की सगळ्या महिलांना बोलतं करता येते. नेहमी ठराविक महिलाच आपले विचार ठामपणे मांडत असतात, इतर महिला मात्र फक्त श्रवण करण्याचे काम करतात. अशा चर्चा जेव्हा मंडळात घेतल्या जातात तेव्हा मात्र सर्व जणी त्यात भाग घेत असत. आजच्या चर्चा मध्ये सर्वानीं सहभाग व्हावे असे सांगण्यात आले. चर्चा साठी विषय दिला होता "खिडकी" विषय ऐकून आम्ही सर्व जणी विचारात पडलो. खिडकी वर एक तास काय चर्चा करणार? तशी शंका ही काही महिलांनी बोलून दाखवली. यावर अध्यक्षांनी सुरुवात केली" घरातील हवा खेळती राहावी व भरपुर सूर्य प्रकाश यावा. यामुळे घरातील वातावरण शुध्द व प्रसन्न राहावे या साठी आपण घराला भरपूर खिडक्या ठेवतो. असे प्रत्येकींने खिडकी या विषयी आपले मत मांडावे.
महिला मध्ये कुजबुज सूरु झाली. तू बोल, मी बोल करता करता शीलाने बोलण्यास सुरुवात केली. मला तर खिडकी पाहिली लहानपण आठवते. तो पडणारा पाऊस, सुसाट वारा, पौर्णिमेला पडलेले 'लख्ख चांदण' चंद्र हे आम्ही याच खिडकीतून पहात असत. या खिडकी मुळेच मला माझे बालपण आठवले. मनाची खिडकी उघडल्यावर स्वतः मधले 'चांगले व वाईट' गुण याच खिडकीद्वारे आपण बघू शकतो, असे मत होते रेखाचे तर वयाने थोड्या मोठ्या असलेल्या प्रमिलाताई म्हणाल्या,आमच्या सारख्या वृध्द व्यक्तीला या खिडकीजवळ बसल्या बसल्या बाहेर डोकावता येते. आजूबाजूला काय चालले आहे, याची कल्पना येते पण त्या बरोबरच कंटाळवाणी झालेल्या मनाला उभारी येते. त्यामुळेच आजारी व वृध्द लोकांची या खिडकीशी मैत्री होते.
माझ्या लहान मुलांना घास भरवतांना याच खिडकीचा उपयोग करत' एक घास चिऊचा , एक घास काऊचा करत तो आनंदाने जेवण करतो. या खिडकीमुळे मुलाची विविध पक्षांची ओळख झाली, असे मत होते नीलाचे. त्या वर देशमुख काकू म्हणाल्या, बरेच दिवस जुन्या घरामध्ये राहत होतो. त्या घराच्या बाजूला आंब्याचे झाड आहे. जेव्हा आंब्याच्या झाडाला मोहर येतो तेव्हा याच खिडकी मधून आम्ही पाहत असतो. झाडाला छोट्या छोट्या कैर्या आल्याची गोड बातमी ही हिच खिडकी आम्हाला देते. मुंबईमध्ये घरच्या खिडकीतून येणाऱ्याजाणाऱ्या लोकांना गरीब लोकांचा सर्व संसार दिसतो. याच खिडकीला पडदा लाऊन गरीब लोकांना संसार मांडावा लागतो असे मीना म्हणाली. प्रवासात खिडकी जवळची जागा मिळावी यासाठी गाडीचे सिट रिझर्व्ह करून ठेवते. खिडकीतून बाहेरचे दृष्ये बधण्यास मजजा येते व प्रवास सुखकर होतो असे गीताला वाटते.
नवीन लग्न झालेल्या रूपाचे सासर व माहेर एकमेकांच्या घरासमोर आहे. "मेरे सामनेवाली खिडकी मे, एक चांद का तुकडा रहता है" असे गाणे गुणगुणत या समोरासमोर असलेल्या खिडकीमुळे त्या दोघात प्रेम झाले व नंतर लग्न . तरूण तरुणीला एकमेकांच्या मनाचा अंदाज याच खिडकीमुळे घेता येतो. एकदा खेळतांना लहान भाऊ खिडकीतून खाली पडला अन आमच्या काळजाचा ' थरकाप ' उडाला .पण जेव्हा खाली पडलेला माझा भाऊ सुखरुप असलेला पाहून खूप आनंद झाला हा अनुभव होता रेवतीचा .लहान मुलांने खेळता खेळता दाराला आतूइ कडी लावून घेतली. त्या वेळी याच खिडकीतून हुकाला हुक अडकून घराचे दार उघडले असे सायली म्हणाली तर आम्हाला दार उघडण्यासाठी खिडकीचे गज कापून आत जावे लागले .हा अनुभव होता रमाचा.
एखादा हट्टी प्रेमवीर आपल्या प्रेमीकाला खूष करण्यासाठी घरासमोर दिवसभर उभा राहतो तेव्हा नकळत प्रेमिका चे लक्ष त्याच्या कडे जाते तेव्हा ती त्याला सावध करत म्हणते "शाम ढले खिडकी तले, तुम सिटी बजाना छोड दो", असे म्हणत त्याला समजावते. प्रेमी यूगलांना तर एक प्रेमाचा कटाक्ष एकमेकांनावर टाकण्यासाठी या खिडकीचा खूप उपयोग होतो. अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांना याच खिडकीच्या झरोक्यातून सूर्यप्रकाश मिळत असे. हाच 'झरोका' सावरकरांना विरुगुंळा होता. जेव्हा सावरकर ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन दोन शिपाई बरोबर असताना शौचालयातील वरच्या खिडकीतून पलायन करण्यास यशस्वी झाले. त्यांनी ही खिडकीचाच साहारा घेतला होता.
आगळे काका गेल्यापासून काकू एकाकी पडल्या होत्या. जेव्हा त्या एकट्या असत तेव्हा बंद खिडकीचे एक दार उघडून आकाशाकडे टक लाऊन तासन तास बघत असत. ढगाची आभाळात होणारी आगेकूच. ढगाचे वेगवेगळे बनणारे चित्र पाहण्यात कितीतरी वेळ जात असत. जसे खिडकी बाहेर ढगाचे संमेलन भरले आहे असे त्यानां वाटत असे.काका गेल्या नंतर याच खिडकीच्या आधारे काकू मुक्तपणे काकाशी संवाद करत असत. हे सांगताना ही काकूचा कंठ दाटून आला होता. मंडळातील वातावरण आगळे काकूच्या बोलण्यामुळे भावूक झाले होते. ती शांतता भंग करत देशपांडे काकू म्हणाल्या , खिडकी दिसली की माणूस सहज डोकावतोच. हा माणसाचा स्वाभाविक गुण आहे. शेजारच्या खिडकीतून डोकावून बघितले मुळे चांगले, वाईट अनुभव पाहवयास मिळतात. अनेक संवाद ऐकायला येतात. जागरहाट समजते. प्रत्येक घराला खिडकी पाहिजेच. खिडकीमुळे अंधार व प्रकाशाची जाणीव होतेच पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूचना त्वरित शेजारणीला या खिडकीतून सांगता येतात. चाळीतील घरामध्ये अचानक पाहुणे आल्यावर दूध, साखर किंवा चहा पावडर या पैकी कशाची ही गरज पडली तर नकळत रसद पुरवण्यासाठी खिडकीचा खूप उपयोग होतो.
शेवटी मी म्हणाले, माझे व माझ्या मैत्रीणीचे घर समोरा समोर आहे. मध्ये मात्र रस्ता असून समोरच्या खिडकीतून आम्ही एकमेकींना खाणाखुणा करुन संवाद साधतो . याच खिडकीमुळे मला चिमणीशी मैत्री करता आली .तीन वर्षे चिमणीची सहवास लाभला. तिच्या पिलाचे जवळून निरीक्षण करता आले. सरते शेवटी मनात विचार आला "एक खिडकी मनाला असती तर अंतरंगात डोकावून प्रत्येका विषयी वर्षानुवर्षे जपून ठेवलेली आसूया, अढी, राग, व्देष, मोह, मत्सर, संताप ईर्षा हे किती मलीन आणि काळेभोर झालेले दिसले असते. याच बरोबर अनेक वृध्दाश्रमामधील वृध्दव्यक्ती खिडकीच्या गजाला धरुन कधीही न भेटायला येणाऱ्या आपल्या परिवाराची प्रतिक्षा करत, जीवन हरल्याची जाणीव हीच खिडकी या वृध्दानां करून देते. आहो खर आहे ही खिडकी प्रत्येकाच्या आयुषातील अविभाज्य घटक आहे . प्रत्येकांच्या सुखदुःखाची साक्षीदार आहे.
तर या सर्व चर्चा मधून माझी मैत्रीण संजीवनी लोहारकर ने अतिशय सुंदर कविता केली.
खिडकी
खिडकी लहान मुलांची—
आतुरतेने आईवडिलांची वाट पाहणारी
मित्रांची टोळी खेळायला आली क
ते
शोधणारी.
खिडकी तरूण-तरुणांची—
प्रेमानं एकमेकांना शिळ घालणारी
एकमेकांना खुणावणारी.
खिडकी आतुरलेल्या आईची—
उशिर झालेल्या लेकरांची तळमळीनं वाट पाहणारी.
खिडकी आजी-आजोबांची—
आजवरच्या आयुष्याची स्मृती जागवणारी,
उर्वरित आयुष्यासाठी प्रकाश शोधणारी
खिडकी रिकामटेकड्यांची—
दुसऱ्यांच्या घरात उगाच डोकावणारी
नसत्या भांगडींचा कानोसा घेणारी
खिडकी एक विरंगुळा.
खिडकी एक दिलासा.
तर अशी ही "खिडकी " या विषयावर काय बोलणार ? हा प्रश्न सुरुवातीला सर्वांनाच पडला होता. चर्चा चांगलीच रंगत चालली होती. अजूनही बर्याच जणींना बोलण्याची इच्छा होती पण वेळे अभावी आध्यक्षांना चर्चा थांबवावी लागली.
सौ. प्रतिभा विभूते.
Comments
Post a Comment