माझा पहिला विमान प्रवास

                                                               माझा पहिला विमान प्रवास
      

          माझ्या अनेक  मैत्रिणी सिंगापूर ला जाऊन आल्या होत्या, त्याच्या कडून बऱ्याच वेळा सिंगापूरचे वर्णन ऐकले होतेसिंगापूरला जाण्याचा योग आपल्या नशीबात कधी येईल असे स्वप्नात देखिल वाटत नव्हते. पण मुलगा नोकरी निमीत्ताने सिंगापूर ला गेल्यावर मात्र कधीतरी आपल्याला ही संधी नक्की मिळेल अशी आशा मनात निर्माण झाली. माझ्या मुलाला आठवड्यात दोन दिवसाची सुट्टी मिळत असल्याने तो सुट्टीच्या दिवशी सिंगापूर मधील अनेक ठिकाण पाहण्यासाठी जात असे. तेथील अनेक प्रेक्षणीय स्थळांची माहिती आम्हाला फोनवर सांगत असे. बघता बघता सहा महिने निघून गेले.दिवाळी जवळ आली तसे मुलांच्या वाटेकडे आमचे डोळे लागले होते. तो दिवाळी साठी येणार होताच पण दिवाळी नंतर आम्हाला ही सिंगापूर ला घेऊन जाणार असल्याचे आम्हाला कळवले होते. याच संधीची आम्ही आतुरतेने वाट पहात होतो. मला खूप आनंद झाला. स्वप्नात सुध्दा खरी वाटणारी गोष्ट सत्यात घडणार होती. त्या वेळी मी फारसा रेल्वे प्रवास सुध्दा केलेला नव्हता पण आता मात्र मी विमानाने प्रवास करणार होते. कस वाटेल आपल्याला विमानात बसल्यावर? याची कल्पना करत मी दिवाळीच्या तयारीला लागले.                       
                    मी सिंगापूरला जाणार असल्याची बातमी लवकरच माझ्या मैत्रिणींना समजली.ज्या मैत्रिणी यापूर्वी सिंगापूर ची ट्रिप करून आल्या होत्या त्या मला प्रवासात काय काय तयारी करून जावे याची माहिती देऊ लागल्या. तर काही जणी प्रथम विमानप्रवासात कशी फजिती झाली याचे वर्णन करून सांगू लागल्या. काही मैत्रीणीने मात्र आम्ही खूप मजा केली असे सांगितले.सर्व मैत्रीणींच्या सुचना लक्षात ठेवून मी प्रवासाची तयारी केली.ठरल्याप्रमाणे दिवाळीसाठी मुलगा इंडिया ला आला.येतांना आम्हा दोघांचे तिकीटे व्हिजा घेऊन आला. आनंदाने दिवाळी पार पडली आणि दुसऱ्या दिवशीच पहाटे चार  वाजता आम्ही प्रवासाला निघालो. विमानात बसण्याची वेळ जसजशी जवळ येत होती तसतशी माझ्या ह्दययातील धडधड वाढू लागली. प्रत्येक गोष्ट नीट व्यवस्थित घेतली का याची परत एकदा तपासणी करून घेतली. मुलगा म्हणाला बाकी इतर गोष्टी पेक्षा महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे पासपोर्ट ,व्हिजा नीट सांभाळून ठेवा.कारण हे हरवले तर परदेशात खूप अडचणी येतात म्हणून आम्ही पासपोर्ट स्वतः च्या जिवापेक्षा जास्त जपून ठेवत होतो. सर्व सामानाचे वजन बरोबर होईल ना?का उगीच जास्तीचे पैसे द्यावे लागतील अशा अनेक गोष्टी चा विचार करतच घरातूनबाहेर पडले. माझ्या आयुष्यातील हा पहिला विमानप्रवास कसा होईल? आकाशात विमानाचा जोरात  आवाज आला की मान उंचावून आकाशातील विमान बघणारी मी आज प्रत्येक्ष विमानात बसणार होते. पूर्ण प्रवासात मला झोप आली नाही. सतत विमानात बसण्याच्या  कल्पनेने  मनात थोडी उत्सुकता तर थोडी भीती वाटत होती , मनात विचार करतच एअरपोर्ट वर पोहचले.                       
                     सकाळचे सात वाजले होते.मुलगा म्हणाला आपल्याला अजून बराच वेळ आहे.आपण वेटिंग रुम मध्ये थांबू. आम्ही तिकडे गेलो. आहो ती वेटिंग रूम म्हणजे भला मोठा हाँल होता सर्व सोयी तिथे उपलब्ध होत्या. मी फ्रेश होण्यासाठी  बाथरुम कडे गेले. एअरपोर्ट वरील ते चकाचक  बाथरूम ,बेसीन  बघून आपन अजून भारतात आहोत का?या गोष्टीची खात्री वाटत नव्हती. प्रवासात एवढे स्वच्छ बाथरूम, टाँयलेट आपल्याकडे कधी बघायला मिळत नाही म्हणून मी आश्चर्याने पाहत होते. इतक्यात माझ्या जवळच्या नळावर एक बाई हात तोंड धुवत होती. तिचे हात तोंड धुऊन झाल्यावर ती नळ बंद करताच निघून गेली. पाणी वाया जाऊ नये म्हणून मी पटकन  नळाखाली हात धरला.त्या बाईचा मला खूप राग आला होता. एवढी साधी गोष्ट कळत नाही का? पाणी निष्कारण वाया घालवतात अशी माणस.मी विचार करतच हात तोंड धुतले.नळबंद करावा म्हणून काँक दाबून पाहिला पण नळ काही बंद होईना. आजूबाजूला, वरखाली सगळी कडे शोधाशोध केली पण नळाचा काँक काही केल्या सापडला नाही. थोड्या वेळापूर्वी ती बाई नळ चालू ठेवून का गेली त्याचे उत्तर मला आता मिळाले होते. माझ्या वर पण तीच वेळ आली होती. बाहेर जाऊन मुलाला सांगावे हा विचार करत मागे फिरले अन् काय आश्चर्यनळ आपोआप बंद झाला. मी विचारात पडले,   एवढा वेळ मी नळ बंद करण्याचा  प्रयत्न करत होते त्या वेळी नळ बंद झाला नाही, आणि आता काही करता नळ कसा काय बंद झाला ?हा मनाला प्रश्न विचारत परत हात लावून पहात होते तेवढ्यात नळ पुन्हा सुरु झाला. मी परत बाजूला झाले, पुन्हा नळबंद "आरे च्या अशी भानगड आहे का? " मग आपले अज्ञान झाकण्यासाठी आजूबाजूला कोणी आपल्याला पहात तर नाही ना?याची खात्री करुन मी पुन्हा दोन तीन वेळा तो प्रयोग करून पाहिला. नंतर  माझे मलाच हसू येत होते. मी बाहेर येऊन मुलाला मिस्टरांना ही गोष्ट सांगितली.तसे ते दोघेही हसायला लागले. मुलगा म्हणाला ' सेन्सर ' पध्दतीने नळ चालू बंद होतो.                      
                         नंतर आम्ही सर्व लगेज जमा केले.सुदैवानं बरोबर घेतलेल्या बँगाचे वजन बरोबर भरले .त्या मुळे आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.मग आरामशीर नाश्ता  केला. डिसेंबर महिना असल्याने बरीच थंडी वाजत होती .मुलगा म्हणाला जवळच काँफी  शॉप आहे.गरमागरम काँफी घेऊ या.आपल्या कडे गरम फेसाळलेला चहा मी बऱ्याच वेळा पाहिलेला होता पण मोठमोठ्या कपामध्ये काँफी त्यावर डोलदार आकाराची क्रीम टाकलेली काँफी मी प्रथमच पहात होते. काँफी खूप छान दिसत होती. आम्ही काँफीच दोन कप मागवले .मुलाला म्हटले एवढे मोठे कप ! आरे या एका कपामध्येच किती काँफी आहे दोन तीन माणसाला सुध्दा संपणार नाही. तसा मुलगा म्हणाला काही लोकांना भरपूर काँफी पिण्याची सवय असते म्हणून मोठे  कप भरून देतात. या दोन कप काँफीची किंमत चारशे रूपये होती. काँफीची किंमत ऐकूनच माझ्या जिभेवर पिताच काँफीची कडवट चव रेंगाळत असल्याचे जानवत होते. मी मुलाला म्हणाले आरे नाशिक ला तर चारशे रुपयात आख्या सोसायटीच्या लोकांनी काँफी पिली असती.मुलगा हसत म्हणाला हे एअरपोर्ट आहे नाशिक नाही. तू परदेशात चालली आहेस तेव्हा इथल्या वस्तूंची किंमतीशी तुलना करू नकोस. मनात म्हटल चला जाऊ द्या. एक कपासाठी दोनशे रुपये  दिले आहेत, तेव्हा  ही काँफी नक्कीच वेगळी असणार! पिऊन तर पाहू म्हणत एक घोट मोठ्या ऐटीत घेतला आणि तिथे कुठे थुंकता येत नव्हते म्हणून तो घोट गटकन गिळून टाकला. इतकी कडवट चव होती त्या काँफीची ,परत कधी आयुष्यात एअरपोर्ट वर काँफी  पिणार नाही असे मी ठरवून टाकलेमाझे  वेडेवाकडे तोंड पाहून मुलगा म्हणाला मम्मीला काँफी खूपच आवडलेली दिसते असे म्हणत मला पाहून हसत होता. पूर्ण  प्रवासात  माझ्या जिभेवरची ती कडवट चव रेंगाळत होती.                                            
                         विमान निघण्यास अजून एक तास बाकी होता. आम्ही स्वतः चे चेकिंग नंतर इमेग्रेशन करून  आत जाऊन बसलो. एकदा सिक्युरिटी चेकिंग झाल्यावर बाहेर येता येत नाही. सर्व काम सुरळीत पार पडले होते. उगीचच माझ्या मनात शंकाकुशंका थोड्या का होईना दूर झाल्या होत्या. मग आम्ही गेट जवळ जाऊन तेथे उभे असलेले अनेक लहान मोठी विमान काचेमधून अधाशा सारखे पाहू लागलो. बाप रे! केवढी मोठ मोठी  विमान(जशा बस स्टेशनवर खूप बस उभ्या असतात तशा प्रकारे) उभे होते. एवढ्या जवळून विमान बघताना मज्जा वाटत होती. केव्हा एकदाची वेळ संपते याची आम्ही वाट पहात होतो. थोड्याच वेळात गेट उघडले. आम्ही विमानात गेलो.जागोजागी खूप मेकअप  केलेल्या , सुंदर दिसणाऱ्या, लाघवी  बोलणाऱ्या वाकून गालातल्या गालात  हसणाऱ्या एअरहोस्टेस उभ्या राहून विमानातील प्रवाशांचे स्वागत करत होत्या.आँस्टेलियाचे विमान असल्यामुळे सर्व एअरहोस्टेस मुल मुली गोरे रंगाचे होते, जे भारतीय लोकांना कधीकाळी काळे ,गुलाम म्हणून हिणवत होते तेच लोक आज विमानामध्ये सर्वांच्या सेवेसाठी हजर झाले होते.                        
                          माझ्या डोक्यात विचार चालू असतानाच विमानाच्या आत केव्हा प्रवेश केला ते समजले सुध्दा नाही. पिक्चर मध्ये ज्याप्रमाणे हारतुरे घेऊन टाटा-बाय बाय करणारे लोक इथे एअरपोर्टवर दिसत असत तसे इथे कोणीही दिसत नव्हते. मी आश्चर्याने मुलाला विचारले तसा तो म्हणाला आता पूर्वी सारखे राहिलेले नाही. विमानाला शिडी लावली  जात नाही तर " एरोब्रीज " (बोगदा असतो तसा ) लावला जातो. त्यामधून तर आपण विमानात आलो आहोत.आम्ही आमच्या सिटवर जाऊन बसलो. प्रत्येकजन आप आपले सामान  व्यवस्थित ठेवत होते.सीटच्या वरच्या बाजूला सामन ठेवण्यासाठी चांगली सोय केलेली होती. सिटच्या समोरच्या बाजूला छोटासा स्क्रीन होता त्यावर कोणी पिक्चर पहात होते तर कोणी गाणे ऐकत होते.आमच्या सारखे नवख्ये मात्र कावऱ्याबावर्या नजरेने इतरांचे निरीक्षण करत होते. जसे एखादे लहान मुलाला नवीन  खेळणी मिळाल्यावर तो त्या खेळणीचे बारकाईने निरीक्षण करतो. त्याबरोबर खेळतांना त्याला खूप आनंद, आश्चर्य वाटत असते तसे आम्हाला या क्षणी वाटत होते.                       
                         थोड्याच वेळात विमान सुरु झाले तशा सुचना देण्यास सुरवात झाली. वेळ पडल्यास आँक्सीजन कसे लावावे? संकटाच्या वेळी जाकिटचा वापर कसा करावा? याचे प्रात्यक्षिक स्क्रीन वर दाखवत होते पण ते इतक्या लवकर दाखवले गेले की पाहताक्षणी पटकन संपून गेले.मला त्यातले काही कळले देखिल नाही. आँस्टेलियाचे विमान असल्याने सर्व सुचना इंग्रजी भाषेत देत होते त्यामुळे त्या मला थोड्या फार समजल्या. संकटाच्या वेळी जाकिट घालून बाहेर कसे पडावे याची माहिती देत होते. सुचना मला पूर्ण पणे समजल्या मुळे मी घाबरून गेले होते. आपल्याला वेळेवर जाकिट नीट घालता येईल ना? आजूबाजूला विमानाचे दार कुठे दिसते का?ते पहात होते पण ते काही दिसेना , राहवून मुलाला परत विचारले  " संकटाच्या वेळी विमानाचे कोणते दार उघडते? ते मला दाखव नाहीतर  दार शोधता शोधता मी विमानासहीत खाली येईल. माझे बोलणे ऐकून मुलाला हसू आवरत नव्हते. तसा तो म्हणाला मम्मी अस काही होत नाही मी आहे ना ,मग कशाला उगीच काळजी करतेस ? तू आनंदाने  ,मजेत विमान प्रवास कर.वेळोवेळी मी तुला सर्व माहिती देत राहिल.खर तर मुलगा मनातून खूप खूष झाला होता.बऱ्याच दिवसापासून आपल्या आईवडीलांची परदेशी जाण्याची इच्छा आपण पुर्ण करणार आहोत या गोष्टीचा त्याला खूप आनंद झाला होता. आज आम्ही बालक झाल्यासारखे वाटत होते तर मुलगा मात्र आमचे पालक असल्याप्रमाणे  आमच्या प्रत्येक शंकेचे निरसन करत होता.
             सर्वांना बेल्ट बांधण्याचे सांगण्यात आले .हळूहळू विमान धावपट्टी कडे जाऊ लागले. थोडे पुढे गेल्यावर विमानाची गती वाढली नी बघता बघता विमानाने आकाशाकडे झेप घेतली तशी माझ्या ह्दयाची धडधड वाढू लागली. ठराविक अंतरावर गेल्या वर विमान स्थिर होऊ लागले. मी उघड्या डोळ्यांनी परदेशी जाण्याचे माझे स्वप्न साकार झाल्याचे पाहत होते. विमान ढगातून जात होते.थोड्याच वेळात ढग जाऊन चांगले ऊन पडले.. खिडकीतून बाहेरचे दृष्य अतिशय सुंदर दिसत होत.निळसर आकाश पांढरे शुभ्र ढग जणू काय पिंजलेल्या कापसाचे मोठ मोठे गठडे ठेवल्यासारखे वाटत होते.निसर्गाचा हा अनमोल देखावा मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवत  होते. बेल्ट सोडण्याची सुचना परत देण्यात आली आणि एअरहोस्टेस ची धावपळ सुरू झाली. अतिशय चपळतेने त्या कामाला लागल्या होत्या. एका  टे् मध्ये पांढरे शुभ्र वाफाळलेले टाँवेल घेऊन एअरहोस्टेस आमच्या जवळ आली चिमट्याने टाँवेलची गुंडाळी पकडून आम्हाला देऊन गेली. आता या गुंडाळी चे काय करायचे? विचार करत आजूबाजूला निरीक्षण करत असताना सर्वांनी गुंडाळी सोडून त्या वाफाळलेल्या टाँवेलने हाततोंड  पुसत असल्याचे दिसत होते. मी ही त्यांचे अनुकरण करत टाँवेलचा वापर करून घेतला. विमानातील थंड वातावरणामध्ये त्या वाफाळलेल्या टाँवेलने हाततोंड पुसल्यावळ अंगातील बराच शीण कमी झाल्याचे जानवत होते. मी तो टाँवेल परत घडी करुन व्यवस्थित ठेवला. थोड्या वेळाने परत एअरहोस्टेस जवळ आली पण यावेळी तिच्या हातामध्ये रिकामा टे् होता, तिन मोठ्या अदबीने तो टे् आमच्या समोर धरला. मला काही कळेना? तेवढ्यात माझ्या मिस्टरांनी तो अंग पुसलेला टाँवेल  ट्रे मध्ये ठेवला   मला इशारा केला. मी ताबडतोब माझ्या जवळचा टाँवेल टे् मध्ये ठेवून दिला. थँक्स म्हणत ती निघून गेली. मनात म्हटल परत घ्यायचा होता तर मग दिलाच कशाला?" नाव मोठ लक्षण खोट " ही म्हण मला याक्षणी आठवली.                      
                           मी खिडकीतून बाहेरचे दृष्य पहात होते. खाली निळसर रंग पसरलेला तर वर निळसर आकाश, ढगांच्या वरून आमचे विमान जात होते जणू काय ढगाने विमानासाठी पायघड्या आंथरल्यासारखे वाटत होते. मी बाहेरचे दृष्य पाहण्यात दंग असतांनाच दुसरी एअरहोस्टेस आमच्या जवळ आली. तिच्या लाघवी बोलण्याने मी भानावर आले नी माझे लक्ष तिच्या कडे गेले. ती दिसायला अतिशय सुंदर होती. मी तिच्या कडे पहातच बसले. तिने परत हँलो मँम म्हणताच मी सावध झाले. पाण्याची बाटलीबरोबर इतर गरजेच्या वस्तू जसे थंडी असल्यामुळे पायात घालण्यासाठी साँक्स, कापूस ,हेडफोन आणून दिला. विमानात थंडी वाजते म्हणून आधीपासूनच प्रत्येक सिटवर उशी शाल ठेवलेली होती. " हा एवढासा कापूस कशासाठी दिला आहे? "मी पुन्हा बाळबोध प्रश्न मुलाला विचारला.कानाला आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी तो कापूस दिला आहे ,त्या क्षणी मला माझ्या मैत्रीणींने सांगितलेल्या गोष्टीची आठवण झाली .कोणी म्हणे विमानात बसल्यावर कान बंद होतात तर कोणी म्हणे नाक बंद होते. मी स्वतः डॉक्टर असल्यासारखे अधूनमधून माझे शरीर तपासून पहात होते. सर्व काही व्यवस्थित चालू होते ते बघून मला बरे वाटले.दुपारचे जेवण झाल्यावर बहुतेक मंडळी झोपण्याची तयारी करत होते. पण मला बिलकुल झोप येत नव्हती. खरतर काल रात्रीपासूनच माझी झोप उडाल्यामुळे शरीरात आता थकवा जानवत होता. मी खूप थकल्या सारखी दिसत असल्यामुळे मुलगा म्हणाला मम्मी चहा किंवा काँफी घेतेस का? जरा फ्रेश वाटेल. पुन्हा काँफी म्हटल्यावर माझ्या जिभेवर ती कडवट चव पुन्हा रेंगाळल्या सारखी वाटली.त्याला म्हटलं पुन्हा माझ्या समोर काँफीचे नाव सुध्दा काढू नकोस. विमानातील वातावरण अतिशय थंड होते अशा वेळी गरमागरम चहा घेतला तर अंगातली सुस्ती निघून जाईल म्हणून चहा मागवला. चहा लगेच मिळाला पण तो नक्की चहा होता की कोमट पाणी? असो .कदाचित विमानातील थंड वातावरणाचा परिणाम असावा असे मला वाटले.याक्षणी मला आपल्या कडे टपरीवर मिळणारा चहा आठवला.तो यापेक्षा कितीतरी चांगला असतो  आल,गवतीचहा घालून केलेला चहा अतिशय स्वादिष्ट असतो.                                             
                              मला टाँयलेटला जायचे होते. मी टाँयलेट कडे जात असताना मला अचानक आमच्या महिला मंडळामध्ये केलेले नाटकाची  आठवण झाली. त्यामध्ये अशाच नवख्या महिला  प्रथमच विमान प्रवास करत असतांना त्यातील एक अतिशय जाडजूड असलेल्या शांताबाई विमानाच्या टाँयलेट मध्ये आडकून बसलेल्या असतात, तेव्हा तेथे दुसरी एक गलेलठ्ठ जपानी  बाई येते ती शांताबाई ला जोरात धक्का देते त्या नंतर टाँयलेट मधून शांताबाईची सुटका होते असा प्रसंग त्या नाटकामध्ये होता नी याक्षणी मला आठवत होता. याचे कारण विमान जरी खूप मोठे असले तरी त्यातील टाँयलेट खूपच लहान असते असे त्या नाटकातील प्रसंगावरून आम्हाला समजले होते.ती वेळ माझ्या वर येऊ नये म्हणून मी सावधपणे टाँयलेट चे दार उघडून प्रथम सर्व निरीक्षण करून घेतले. यामध्ये आपण आडकणार तर नाही ना? याची खात्री करून आत गेले.सुदैवाने मी सुखरूप बाहेर आले.पण नाटकातील काही प्रसंग आठवून माझे मलाच हसू येत  होते. मला असे हसताना पाहून मुलगा समजून गेला. काही तरी विचीत्र घडले असावे.तेवढ्यात पुन्हा सुचना चालू झाल्या. बेल्ट बांधण्याचे सांगण्यात आले. थोड्याच वेळात विमान सिंगापूरचे नंदनवन गाठणार होते. सिंगापूरला आमचे स्वागत करत विमान हळूहळू जमीनीवर उतरले आणि " ज्याला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात त्या सिंगापूर च्या धरतीवर आम्ही सही सलामत उतरलो. “                        
धन्यवाद!                      

सौ. प्रतिभा मुकूंद विभूते.

Comments

Post a Comment

Popular Posts