प्रेरणा

                                                                              प्रेरणा                                            
                 रोज सकाळी वर्तमान पत्र उघडले की  बऱ्याच वाईट बातम्या वाचायला मिळतात. कुठे खूण, कुठे बलात्कार तर कुठे भष्टाचार झालेल्याच बातम्या असतात. पण एखाद्या वेळी मात्र मनाला आनंद देणारी चांगली बातमी पेपर मध्ये वाचण्यात येते तेव्हा ती बऱ्याच दिवस लक्षात रहाते. अशीच एक चांगली बातमी जी व्यक्ती परोपकारी आहे त्या व्यक्ती पासून आपणही काही बोध घ्यावा या हेतूने ही बातमी तुमच्या पर्यंत पोहचवत आहे.                       
                                            " जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर                       
                                                जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर। "                       
  अगदी बरोबर आहे. रामू हा नाशिक मधे राहणारा.(नाव काल्पनिक आहे.)असेच चांगले सकर्म केल्या मुळे प्रसिध्दीस आलेला .त्याच्या कामाबद्दल परमेश्वर त्याला नक्कीच चांगले फळ देईल. नाशिकला अनेक प्रसिद्ध  मंदिर आहेत.त्यात नाशिककरांचे श्रद्धा स्थान असलेले कपालेश्वर महादेवाचे मंदिर .हे आपल्या सर्वाचे परिचयाचे आहे. या मंदिरात श्रावणात महिनाभर ,सोमवारी महाशिवरात्री अनेक भाविक देवदर्शनासाठी येतात. महादेवाला दुधाने अभिषेक करतात. दिवसभरात हजारो लिटर दुध अभिषेकासाठी वापरले जाते. हे सर्व दुध महादेवाच्या पिंडीवरून सरळ बाहेरच्या बाजूला मोरी केलेली आहे ,तेथून वाहून जाते. त्याचा काहीही उपयोग होत नाही रामू हे दुध वाया जाऊ नये म्हणून मोरीच्या तोंडाला मोठे कँन लावून ठेवतो.सगळे दुध कँन जमा करतो. कँन भरले की सर्व दुध घेऊन सार्वजनिक ठिकाणी जाऊन बसतो. तेथे फिरणाऱ्या कुञ्यांना हे दुध रोज पाजवतो.दररोज नियमित दुध मिळत असल्याने ठराविक वेळेला तेथे खूप कुत्रे जमा होतात. पोटभर दुध पिऊन कुत्रे तृप्त होतातच पण रामूला ही अंतरिक समाधान मिळते. किती चांगले सत्कर्म रामू करत आहे. खरच खूपछान वाटले ही बातमी वाचून पण अशा बातम्या नुसते वाचून चालणार नाही तर त्या पासून प्रेरणा घेणे गरजेचे आहे. असेच एखादे चांगले काम आपणही करू शकता.
 आता सध्या श्रावण सुरु झाला आहे .त्या बरोबरच सणवार ,व्रण वैकल्य सुरु झाले आहे. हे सर्व केल्यामुळे मनाला शांती, समाधान मिळते हे खरे आहे पण हे सर्व करताना कित्येक गोष्टीची नासधूस होते  हे आपल्या लक्षात येत नाही. मी लहानपणा पासून श्रावण महिन्यात सोमवारी उपास करते.पूजा झाली की श्रावणी सोमवार ची कहाणी सर्वाना वाचून दाखवत असे. प्रत्येक कहाणी मधून लोकांना चांगला संदेश दिलेला आहे. या कहाणी मधून मिळालेला बोध आजही माझ्या मनामध्ये खोलवर रूजल्यामुळे माझ्या हातून अन्नधान्याची नासधूस होत नाही. श्रध्देने  जर भगवंताला दोन हात तिसरे मस्तक जोडले तर देव तुम्हाला नक्कीच प्रसन्न होतो. त्या साठी असे हजारो लिटर दूध वाया घालण्याची गरज नाही हे आपल्या ही समजावे म्हणून या कहाणीचा काही भाग मुद्दाम येथे देत आहे. तो वाचल्यावर कदाचित तुम्हाला माझे म्हणणे पटेल.                        
    एकदा एका राज्यात दुष्काळ पडला होता. पाऊस पाणी नसल्याने जनतेचे,मुक्या प्राण्यांचे हाल चालले होते. राज्यतील दुष्काळ जन्य परस्थितीमुळे राजा चिंता ग्रस्त होतो. काय करावे?राजाला काही सुचत नाही. एके दिवशी एक साधू पुरुष राजाला सांगतो ,तू गावाबाहेर जे महादेवाचे मंदिर आहे. त्याचा गाभारा दुधाने भर म्हणजे महादेव प्रसन्न होईल. तुझ्या राज्यात भरपूर पाऊस होईल,पीकपाणी येईल. सर्व जनता सुखी समाधानी होईल. राजा त्या साधुपुरूषाला नमस्कार करतो. दुसऱ्या दिवशी लगेच गावात दंवडी पिटवली जाते. सर्व गावकऱ्याने  आपआपल्या घरचे दुध महादेवच्या मंदिरातील गाभाऱ्यात आणून टाकावे. कुणीही लहान मुले, वासरांना दुध देऊ नये,अशी सक्त ताकीद दिली जाते. राज आज्ञा झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व गावकरी आप आपल्या घरचे सर्व दुध घेऊन जातात नी मंदिराच्या गाभाऱ्यात टाकतात. पण काही केल्या मंदिराचा गाभारा भरत नाही. त्याच गावात एक म्हातारी राहात असते. ती सकाळी लवकर उठून गाईची धार काढते .वासरू गाईला पाजण्यासाठी सोडते.घरातील सर्वांना खाऊपिऊ घालते,त्याचा आत्मा शांत करते.घरातील सर्व कामधंदा आटोपून लोटीभर दुध घेऊन मंदिरात  जाते. तिला पाहून राजा तोंड वेडेवाकडे करतो आणि म्हणतो इतर लोकांनी एवढे मोठ मोठे हंडे भरून दुध आणले तरी देवाचा गाभारा भरला नाही. मग या म्हातारी च्या एवढ्याशा दुधाने काय होईल? म्हातारी मंदिरात गेली, तिने मनोभावे पूजा केली. लोटीतले दुध गाभाऱ्यात ओतले आणि हात जोडून डोळे बंद करून प्रार्थना करु लागली." हे परमेश्वरा मी राजाची आज्ञा मोडली मला माफ कर "गावकऱ्यांनी गावातील सर्व दुध तुझ्या गाभाऱ्यात टाकून सुध्दा तुझा गाभारा भरला नाही. माझ्या या खुलभर(लोटीभर) दुधाने काय भरणार आहे?पण मी तुला हे दुध मनोभावे अर्पण करते आहे,असे म्हणून प्रार्थना करू लागली नी चमत्कार झाला. देवाचा गाभारा दुधाने भरून गेला.धावतच पुजारी मंदिराच्या बाहेर आला राजाला म्हणाला "महाराज चमत्कार  झाला ,मंदिराचा गाभारा दुधाने भरून गेलाआहे.                                               
        आनंदाने राजा मंदिरात आला,पाहतो तर काय या आजीबाई डोळे मिटून ध्यानस्थ बसलेल्या दिसल्या. राजा पुजाऱ्याला म्हणाला हा चमत्कार  कसा झाला? पुजाऱ्याने आजीबाई कडे बोट दाखवले. या म्हातारीने तिच्या जवळचे लोटीभर दुध टाकताक्षणी देवाचा गाभारा भरला. राजाने आज्ञा केली, म्हातारीला पकडून माझ्या समोर हजर करा.शिपायांने म्हातारीला पकडून राजापुढे उभे केले. राजा म्हणाला ,सांगा आजीबाई "तुम्ही काय जादू केली ते? मंदिराचा गाभारा तुमच्या एवढयाशा दुधाने कसा काय भरला?आजीबाई घाबरली  ,म्हणाली मला माफ करा राजेसाहेब. मी आपली आज्ञा भंग केली  आहे. आपण गावातील सर्व लहान मुले ,गोठ्यातील लहान वासरांना उपाशी ठेवून सर्व दुध गावकऱ्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात आणून टाकण्याची आज्ञा केली. त्यामुळे सर्व बाळगोपाल उपाशी राहिले, गोठ्यातील वासर केविलवाणी झाले आहेत. सर्वाचे पाप तू माथी घेतले आहेस. सर्व बाळगोपाळांचा तळतळाट तुम्हाला लागला आहे , हे सर्वशं करणे  देवाला आवडले नाही म्हणून देवाचा गाभारा भरला नाही. मी मात्र घरच्या लहान मुलांना ,वासरांना पोटभर दुध  पाजले त्याचा आत्मा शांत केला. उरलेले दुध घेऊन मंदिरात आले.मनोभावे शिवपूजा केली. लोटीभर दुध गाभाऱ्यात टाकले. " देव प्रसन्न झाले आणि देवाचा गाभारा  दुधाने भरला . राजाला त्याची चुक समजली. या कहाणी वरुन तरी सर्वानी बोध घ्यावा असे मला वाटते.                                             
 तात्पर्य काय तर श्रध्देने  देवाची पूजा केली तर तुमच्या मनोकामना देव नक्कीच पूर्ण करेल. थोड्या दुधाने जरी देवाला अभिषेक केला तरी देव प्रसन्न होईल. बाकीचे दूध गरजू मुलांना,आजारी व्यक्ती किंवा वृध्द व्यक्तीला पिण्यासाठी द्यावे. याची त्याना नितांत गरज असते. असे केल   तर  खरोखर पुण्याचे काम केल्या सारखे होईल देव तुमच्या वर प्रसन्न होईल.प्राणी माञावर दया दाखवून मानवी सेवा करा. अहो " मानवी सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे " हे जाणून घ्या. देव तुमच्या माझ्या ह्रदयात आहे. आपण मात्र इतरत्र शोधत असतो. या गाण्याप्रमाणे.....                       
                                         " कुठे शोधीशी रामेश्वर अन् कुठे शोधीशी काशी।                       
                    ह्रदयायातील भगवंत राहिला ह्रदयातून उपाशी                        
                                            देव बोलतो  बाळ  मुखातून  देव बोलतो उंच पिकातून                       
                    कधी  होऊन देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी                      
                                            अवती भवती असून दिसेना शोधतीस आकाशी ।“                        
अहो तुमच्या माझ्या ह्रदयायातील भगवंत उपाशी राहिला तर ते देवाला आवडेल का? अभिषेकासाठी दुध वाया घालण्यापेक्षा लोकांचा आत्मा तृप्त करा म्हणून म्हणते देव तुमच्यापुढे कुठल्या  रूपाने ,कधीही येईल हे सांगता येत नाही. तो माणसा माणसा मध्ये शोधा.जसा रामू सारखा देवमाणूस चांगले कार्य करुन भूतदया दाखवत अनेक प्राणी मात्राचे जीव वाचवत आहे.त्या पासून आपण ही प्रेरणा घेऊन प्रत्येकांने आपल्या हातून ही असेच चांगले कार्य घडावे ,यासाठी प्रयत्न करावे. हीच परमेश्वरा जवळ मनोभावे प्रार्थना करते आणि येथेच आपली रजा घेते.                       
धन्यवाद !                       

सौ .प्रतिभा मुकूंद विभूते. नाशिक.

Comments