अनोखी मैत्री

नाशिक पुणे हा आमचा नेहमीचाच प्रवास. मला  प्रवासात बाहेर चे पदार्थ खाल्ले की लगेचच त्रास होतो म्हणून मी नेहमी जेवणाचा डबा घरीच बनवून घेते. घरची गाडी असली की बरे असते. पाहिजे तेथे गाडी थांबवून सर्व सोय करता येते. मला टपरीवरचा चहा खूप आवडतो. पावसाळ्यात प्रवास करतांना आल गवतीचहा घालून केलेला चहा पिला की अंगात खूप तरतरी येते. त्यामुळे पुढचा प्रवास कंटाळवाणा होत नाही. सहसा आम्ही नेहमी सकाळीच प्रवासाला निघतो. नाशिक पुणे हा रस्ता फारसा चांगला नाही. त्यात खूप वळन आहे, त्यामुळे गाडी सावकाश चालवावी लागते. दुसरी गोष्ट म्हणजे जस जसा सूर्य वर येत जातो तस तसे रहदारी ऊन वाढत  जाते. त्यामुळे पुण्याला पोहोचायला बराच वेळ लागतो. बरोबर शिदोरी घेतली असल्याने रस्त्याच्या कडेला एखाद्या झाडांच्या सावलीत बसून तेथे छान पैकी जेवण करता येते. मोकळ्या हवेत चार घास जास्त खाल्ले जातात. सकाळी लवकर उठल्यामुळे व प्रवास केल्याने थकवा आलेला असतो. त्यात  पोटपूजा झाल्यावर खूप सुस्ती येते मग तेथे छान हिरव्या गवतावर आडवे होउन जातो .                      
एकदा असेच आम्ही जेवण आटोपून थोडी विश्रांती घ्यावी म्हणून चटईवर  झोपलो होतो. याच ठिकाणी आम्ही बऱ्याच वेळा जेवण केलेले आहे. दोनतीन झाडे जवळजवळ असल्याने त्याची दाट सावली पडलेली असते. उन्हाळ्यात तर येथे खूप थंड वाटते .चटईवर झोपले की वर मोकळे आकाश छान दिसते . सहज आजुबाजुला बघताना बाजूच्या  झाडा  कडे लक्ष गेले तर ते झाड पूर्णपणे वाळून गलेले दिसले. एखाद्या माणसाच्या हाडाचा सांगाडा दिसावा तसे झाडांच्या फांद्या दिसत होत्या. दोन महिन्यांपूर्वी तर हे झाड चांगले हिरवेगार होते पण आता मात्र पूर्णपणे सुकून गेले होते. काय झाले असेल याला ? मी विचार करत हळहळ व्यक्त करत होते .कितीतरी येणार जाणारे वाटसरू याच झाडांच्या सावलीत विश्रांती घेत असत.  आता फक्त जळणासाठी या  झाडांचा उपयोग  होईल असा विचार मनात करत होते. माझ्या मनातले विचार जणू झाडाला समजले  तसे झाड चक्क माझ्याशी बोलू लागले .
"मी पूर्ण पणे वाळून गेलो म्हणून काय झाले? मी तुम्हाला फळ, फुल, शीतल छाया देऊ शकत नाही म्हणून मी निरपोयोगी झालो असे कशी समजतेस तू. तूझ आणि  माझ जन्मजन्मांतरीचे नाते आहे. तुझ्या जन्मापासून मी तुझा सोबती आहे". मी म्हटल "कसे काय?" तसे झाड म्हणाले ,"अग ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्या दिवशी तुला झोपवण्यासाठी जी बाज (पलंग)होती ती माझ्याच या वाळलेल्या लाकडापासून बनवलेली होती. तुझे लालन पालन करण्यासाठी जो पाळणा बांधलेले होता ती ही माझीच निर्मिती, एवढेच काय अग तू बाल्य अवस्थेत असताना तुझे मन रमवण्यासाठी बनवलेली खेळणी ही माझ्या पासून बनलेली होती" मी म्हटल ,"ठीक आहे बाबा हे सगळं बालपणच. नंतर काय?" तसे झाड म्हणाले," तू थोडी मोठी झालीस तेव्हा गल्लीमध्ये खेळण्यासाठी जात असत. विटीदांडू तर तुझा आवडता खेळ होता. तो कशा पासून बनतो हे माहित आहे ना तुला? शाळेमध्ये टेबल खुर्ची एवढे काय, तुझ्या बाईने रागाने तुला फेकून मारलेले डस्टर  ही माझ्याच अवयवापासून बनवले आहे.. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मी आश्चर्याने झाडाकडे बघत होते . तसे झाड माझ्याकडे पाहून हसत म्हणाले "असा आश्चर्यानं बघू नकोस, तुझ्या आयुष्यात माझे अनेक उपयोग आहे हे नेहमी लक्षात ठेव."
मी लक्ष देऊन ऐकू लागले तसे झाड म्हणाले, "तू नवरी होऊन बोहल्यावर चढली तेंव्हा देखिल मी तुझ्या बरोबर होतोच की".  मी म्हटल "चल काही तरीच काय? मी नवरी होण्याशी तुझा काय संबंध रे?" .तसे झाड म्हणाले,” वाह तुझ्या लग्नासाठी जो भव्य मांडव घातला होता  तो विसरलीस वाटत? आणि हो लग्नानंतर होणार होमहवन ते सुद्धा माझ्या मदतीशिवाय  होऊच शकत नाही, कारण होमासाठी लागणारया समिधा पण माझ्या पासूनच बनलेल्या आहेत”. आता मात्र हे वाळलेले झाड माझ्या आयुष्यात किती महत्वपूर्ण उपयुक्त आहे हे मी मान्य केले .झाड पुन्हा बोलू लागले, "अग थांब थांब इथेच काही तुझी नी माझी सोबत संपत नाही, तर जेव्हा तुला पुढच्या आयुष्यासाठी आधाराची खरी गरज भासेल तेव्हाही मी तुझा दोस्त बनून तुला आधार देईल." झाडाचे बोलणे ऐकून मला माझी साठी पूर्ण होईल तेव्हा ज्या काठीची गरज पडेल ते आठवले. किती विचारपूर्वक बोलत होते झाड. आपण कधीच इतका पुढचा विचार करत नाही. माझ्या आयुष्यात या माझ्या  (सोबती) चे अस्तित्व मी मान्य केले .                      
शेवटी झाड म्हणाले ,"जेव्हा तुझा अंत होईल, त्याही वेळेस तू माझ्याच अवयवापासून बनलेल्या तेरडीवर झोपून तुझा अंतिम प्रवास करशील आणि शेवटी तुझी चिता रचली जाईल तीही या सुकलेल्या माझ्या देहाची. आता समजलना तुला म्हणून म्हण होतो मी तुझ्या जन्मापासून शेवटी अंतिमयात्रा पर्यंत तुझा सखा सोबती होऊन तुझी साथ देईन. तुला माझ्या मध्ये सामावून घेईल." मी त्याचे बोलणे ऐकून त्याला कोपरापासून हात जोडले म्हटल," चुकले माझे मी तुझ्या अस्तित्वाचा कधी विचारच केला नाही. वाळलेले लाकडे फक्त जळणासाठीच उपयोगी असतात असे मी समजत होते. तू माझ अज्ञान दूर करून हे सर्व समजावून सांगितले त्याबद्दल मी झाडांचे हात जोडून आभार मानत होते." तर माझे पती मला हालवून उठवत म्हणाले," आभार प्रदर्शन झाले असेल तर उठा आता पुढच्या प्रवासाला निघायचे  की नाही ?”.                       
या वृक्षाच्या थंडगार हवेत मला थोडा डोळा लागला होता. माझं स्वप्न भंग झाले आणि मी डोळे उघडून त्या झाडाकडे आदराने पाहिले,
त्या क्षणी झाड खुदकन हसले.


धन्यवाद,
सौ. प्रतिभा विभुते.

Comments

Post a Comment